डॉक्टरांवर ऑक्सिजन प्लांटवर जाण्याची वेळ येऊ देवू नका!

खासदार गोडसे यांचे अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना साकडे
डॉक्टरांवर ऑक्सिजन प्लांटवर जाण्याची वेळ येऊ देवू नका!

नाशिक । Nashik

करोनाने जिल्ह्यात थैमान घातल्याने सर्वत्र औषधांसह रेमेडिसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजनचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची व रुग्णालय प्रशासनाची फरफट सुरु आहे.

उपलब्ध ऑक्सिजन साठा देखील अल्प असून तो केव्हाही संपुष्टात येवू शकतो. त्यामुळे रुणाच्या नातेवाईकांचा रोष पत्करावा लागू शकतो, या चिंतेत डॉक्टर आहेत. रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा, यासाठी डॉक्टर स्वत: ऑक्सिजन प्लांटवर पोहचत आहे. मात्र डॉक्टरांवर थेट ऑक्सिजन प्लांटवर जाण्याची वेळ येवू नये, यासाठी जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजनसाठा उपलब्ध व्हावा, या मागणीसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी आज पुन्हा मुंबईत अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांची भेट घेत आग्रही मागणी केली.

नाशिक जिल्ह्यात अपुऱ्या ऑक्सिजन साठ्यामुळे रुग्णांची मोठ्याप्रमाणात हेळसांड होत आहे. अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी हकनाक प्राण गेल्याने आज खा. गोडसे यांनी पुन्हा अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांची भेट घेत पुरेशा ऑक्सिजन संदर्भात चर्चा केली.

यावेळी खा. गोडसे म्हणाले की, साहेब, पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे प्राण कंटाशी आले आहेत. याशिवाय रुग्णांच्या नातेवाईकांची देखील हेळसांड सुरु असून रुग्णालय प्रशासन देखील मेटाकुटीस आले असल्याची व्यथा खा. गोडसे यांनी मांडली.

जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अपुऱ्या ऑक्सिजन साठ्यामुळे मोठ्याप्रमाणात समस्यांना सर्वानाच सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच जिल्ह्यातील डॉक्टरांसह तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी खा.गोडसे यांची भेट घेवून ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा, यासंदर्भात मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेवून खा. गोडसे यांनी अन्न व औषध पुरवठा आयुक्त सिंग यांच्याशी चर्चा केली.

दरम्यान याप्रसंगी खा.गोडसे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अपुऱ्या ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णालयांनी नव्याने रुग्णांना दाखल करुन घेण्यास असमर्थता दर्शविली आहे. तसेच अनेकांनी रुग्णांना ऑक्सिजन अभावी इतरत्र रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला रुग्णांच्या नातेवाईकांना दिला आहे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नाशिक जिल्ह्याला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा करावा, याशिवाय प्लांटमध्ये ऑक्सिजन टॅँकरची भरण्याची वेळ, त्याठिकाणाहून निघण्याची वेळ तसेच तो टॅँकर किती वाजता कोणाकोणाकडे किती ऑिक्सजन पुरवठा करेल यासंदर्भातील इतंभूत माहिती मिळण्यासाठी टॅकरमध्ये जी.पी.एस.प्रणाली बसवावी, अशी मागणी खा.गोडसे यांनी केली आहे.

ही प्रणाली कार्यान्वित झाल्यास मिळणाऱ्या ऑक्सिजनची पुरेशी माहिती रुग्णालय प्रशासन व रुग्णांच्या नातेवाईकांना देखील मिळण्यास मदत होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील दिले असल्याचे खा. गोडसे यांनी सांगितले.

नाशिक शहरात अपुऱ्या ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचे बळी जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करतांना आपल्याला अजून ऑक्सिजनची अवश्यकता आहे. अन्न व औषध प्रशासनाशी चर्चा केली असून लवकरच ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासह वितरणाबाबत रुग्णालयांना माहिती मिळन्याबरोबरच ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांमध्ये जी.पी.एस. प्रणाली बसविण्याची मागणी केली आहे.

- खासदार हेमंत गोडसे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com