नाशिक l Nashik (प्रतिनिधी) :

नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिकच्या विभागीय महसूल कार्यालयात एका ठिकाणी विभागीय हज हाऊस सुरु करण्यात यावे, अशी मागणी खा. हेमंत गोडसे यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांची भेट घेऊन केली. तसेच पत्र देखील दिले. यासाठी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना मागणीचे पत्र खा. गोडसे यांनी दिले आहे.

खतीब-ए-नाशिक हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने खा. गोडसे यांना निवेदन देऊन नाशिकहून हजसाठी विमान सुरू व्हावे, नाशिकरोड रेल्वे स्थानकातून अजमेर शरीफसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू व्हावी व नाशिकमध्ये विभागीय हज हाऊस तयार व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत खा. गोडसे यांनी प्रयत्न सुरू केले आहे.

दरवर्षी विभागातून हजारो भाविक हज यात्रेला जातात, तर वर्षभर सतत उमराह यात्रा सुरू असते. भाविकांना किरकोळ कामासाठीही मुंबईत जावे लागते. म्हणून नाशिकमध्ये हज हाऊस शाखा सुरू झाल्यास लाखो भाविकांना त्याचा लाभ मिळणार आहे. अशी मागणी खा.गोडसे यांनी ना. मलिक यांच्याकडे केली आहे.