
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील मोटारसायकली चोरी (Theft of Motorcycles) करणाऱ्या टोळीला भद्रकाली पोलिसांनी (Bhadrakali Police) मोठया शिताफीने ताब्यात घेतले आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तसेच या टोळीकडून भद्रकाली पोलिसांनी एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत...
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात मागील काही दिवसात दाखल मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. दाखल गुन्ह्यांचा तपास करत असताना विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे तपास करत असतांना फुटेजमधील संशयितांपैकी एक विधी संघर्षित बालक हा कुंभारवाडा, जुने नाशिक येथील राहणारा असल्याची गुप्त माहिती मिळाली.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाने कुंभारवाडा येथे छापा (Raid) टाकून संशयित विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्यावेळी तपासात गुन्हा हा त्याने व त्याचे साथीदार दुर्गेश नानीकराम उबराणी (वय २५, रा. भन्साळी मळा, मखमलाबाद रोड, पंचवटी नाशिक), अभिषेक अरूण वाघमारे (वय १९, रा. चिंचोळे, नाशिक) व इतर एक विधी संघर्षित बालक यांच्या मदतीने केल्याचे समोर आले. त्यावरून गुन्हे शोध पथकाने संशयित आरोपींना सापळे लावून ताब्यात घेतले.
यावेळी त्यांच्याकडे नाशिक शहरात (Nashik City) घडत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांबाबत कौशल्यपूर्वक व चिकाटीने सखोल तपास करून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गेल्या चार महिन्याच्या कालावधीत त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे (Bhadrakali Police Station) हद्दीत व नाशिक शहरात इतर ठिकाणांवरून मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितल्याने पोलीस पथकाने त्याप्रमाणे आरोपी नामे दुर्गेश उबराणी याच्या सांगण्यावरून एकूण ९ मोटारसायकली हस्तगत करून ६ गुन्हे उघडकीस आणले आहे.
दरम्यान, ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस डॉ. सिध्देश्वर धुमाळ, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि किशोर खांडवी, नरेंद्र जाधव, सतिश साळुंखे, अविनाश जुंद्रे, संतोष खेताडे, नितीन भामरे, नारायण गवळी, रमेश कोळी, संदीप शेळके, लक्ष्मण ठेपणे, बोरसे, निकुंभ, हासे यांच्या पथकाने केली.