येवला । प्रतिनिधी Yevla

नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत सविस्तर माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील घरफोडी गुन्ह्यांचा तपास करत असतांना पोलीस निरीक्षक बर्डीकर यांना पाटोदा येवला येथील घरफोडीत सावरगाव येथील आरोपी असल्याची गुप्त बातमी मिळाली होती.

त्यानुसार ग्रामीण पोलिसांचे पथकाने सावरगाव, येवला शिवारात सापळा रचून संशयित अजय आनंदा लोखंडे, रामा शांताराम लोखंडे दोघे राहणार सावरगाव तालुका येवला यांना २ किलोमीटर पळत पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांना पाटोदा येथील घरफोडीची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गेल्या महिन्यात दि २४ रोजी पाटोदा येथील मोबाईल दुकान फोडल्याची व कोपरगाव येथे मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. सदर मोबाईल दुकान फोडलेबाबत येवला तालुका पोलीस येथे ०६५२/२०२० भादवी ३८०,४६१ प्रमाणे तसेच मोटारसायकल चोरीबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे ०४९९/२०२० भादवी ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपी कडून पाटोदा येथील मोबाईल दुकानातील चोरीस गेलेले लावा कंपनीचे २ मोबाईल फोन, आयटेल कंपनीचे ३ मोबाईल फोन असे एकूण ५ मोबाईल फोन, तसेच हेडफोन, मोबाईल बॅटऱ्या, चार्जर, स्क्रीनगार्ड व कोपरगाव ग्रामीण येथील गुन्ह्यात चोरीस गेलेली बजाज कंपनीची काळे रंगाची MH17CJ5564 नंबर असलेली मोटारसायकल व गुन्हा करते वेळी वापरलेली हिरो होंडा कंपनीची काळे रंगाची स्प्लेडर प्लस मोटारसायकल असा एकूण ६३ हजार ४२५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

यावेळी पोलीस नाईक रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, घुगे, आव्हाड, पटेल यांनी गुन्हे उघडकीस आणून धडक कारवाई केली आहे.