नाशिक । Nashik

पहिल्या पतीपासून जन्मलेल्या मुलाचे सख्ख्या आईनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची ह्रदयद्रावक घटना आडगाव परिसरातील साईनगर भागात घडल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. आठवडाभरापूर्वी या चिमुकल्याचा अंगणात खेळताना जखमी झाला होता, त्यावेळी त्याच्या आईने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्यान आडगाव येथील साईनगर परिसरात (दि.२१ डिसेंबर) रोजी अंगणात खेळताना मोहित नामक एका सातवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हा शासकिय रुग्णालयातून मिळालेल्या माहितीवरुन आडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आई संशयित सुलोचना सोमनाथ कुऱ्हाडे व तिचा पती संशयित सोमनाथ ऊर्फ योगेश वसंत कुऱ्हाडे (२२,रा.साईनगर, नांदुरनाका) हेदोघेही फरार झाले होते.

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक इरफान शेख यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने याबाबत तपास करत मयत मुलाच्या संशयित माता-पित्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. यानुसार उपनिरिक्षक धैर्यशिल घाडगे, दिलीप शिंदे, दशरथ पागी, सुनील गांगुर्डे आदींनी तपासाला गती देत संशयित महिला सुलोचना हिला बेड्या ठोकल्या. तसेच गुन्ह्यात सहभागी असलेला तीचा पती संशयित सोमनाथ यास पोलिसांनी अटक केली.

या दोघांना पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अनैतिक संबंधामध्ये मुलाचा अडसर निर्माण होऊ लागल्याने त्याचे भींतीवर डोके आपटून ठार मारल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी या दोघांविरुध्द खूनाचा गुन्हा व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.