
नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशकात आज दुपारी वरुणराजाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून दडी दिलेल्या पावसाचे आगमन झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पहिल्या वहिल्या पावसांत नाशिककर ओलेचिंब झाले असून अनेक ठिकाणी पहिल्या पावसात भिजून वरुणराजाचे स्वागत करण्यात आले....
आज दुपारी दीड ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत हवामान खात्याने नाशिकसह परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत दिले होते. यासोबतच, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होईल असेही सांगण्यात आले होते. मात्र, पावसाच्या संततधार बरसत असून विजांचा कडकडाट मात्र झालेला नाही.
एकूणच नाशिक शहरातील पावसाने रौद्ररूप धारण केलेले तरी नेहमीप्रमाणे बत्ती गुल झाली आहे. दुसरीकडे, रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले आहेत. यासोबतच अर्धवट स्मार्ट कामाच्या ठिकाणी पाणी साचले आहे. मेनरोड, पंचवटी, गोडघाट, रविवार कारंजा परिसरात खरेदीसाठी आलेल्या नाशिककरांची धांदल उडाली होती.
सातपूर, नवीन नाशिक, नाशिकरोड आणि पंचवटी परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. दुसरीकडे नाशिक तालुका परिसरातही पावसाने हजेरी लावली असून याठिकाणच्या शेतीसाठी फायद्याचा असा पाऊस आज बरसला आहे.