कोणाचे बाण कोणाला लागे; प्रजा मात्र रडे...

विविधा विशेष बिरबल
कोणाचे बाण कोणाला लागे; प्रजा मात्र रडे...

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

एक राजा (King) होता. त्याच्या नगरात कायदा आणि सुव्यवस्था (Law and order) सांभाळण्यासाठी अनेक प्रधान (Secretary) होते. या राज्यातील काही शिलेदार मोठ्या राजाच्या दरबारी देखील होते. अशातच राज्यामध्ये त्या शिलेदारामुळे एक बाका प्रसंग उभा राहिला. शिलेदार राजाबद्दल चुकीची वक्तव्ये करायला लागला....

राजा हे निमुटपणे सर्व काही ऐकत होता. राजाचे वतनदार देखील आदेशाची वाट बघत होते. मात्र, राजा काहीही अनुचित घडू नये, यासाठी कायद्याचा (Law) आधार घेत होता. हा शिलेदार आधी आपल्या गोटात होता आता तो मोठ्या राजाकडे गेला आहे. त्यामुळे आता त्याला धडा शिकवावा लागेलच, या अनुषंगाने राजाने रणनीती आखली.

कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणार्‍या एका प्रधानाला या कामी नेमले. प्रधान तर फार उत्साही होता. त्यालादेखील अशा विशिष्ट गोष्टी करण्याची आणि आपल्या प्रमुखाला खुश ठेवण्याची नामी संधी मिळाली. त्याला या प्रकरणात बारकाईने लक्ष घालून अभ्यास करून कार्यवाही करायचीच होती; आणि त्यातून त्याला राजाची शाबासकी मिळवायची होती.

प्रधानाने आपल्या सैन्यातील एक युक्तीबाज उपप्रधानाला त्याच्या लवाजम्यासह शिलेदाराला आदेशाचा अधिकृत खलिता घेऊन रवाना केले. सूर्योदय झाल्या झाल्या सगळीकडे वार्ता पोहोचली. यामुळे स्वतः शिलेदार व्यथित झाला.

छोटी मोठी वक्तव्ये करून शिलेदाराने वेळ मारून नेली. मात्र, कायद्याच्या कचाट्यातून सुटका कशी होणार, यासाठी प्रयत्न करू लागला. काही वेळात सुटका झाली, मात्र प्रधान मात्र आपल्या आदेशावर ठाम राहिला.

प्रधानाच्या कार्यक्षेत्रात दोन्ही राजांचे सैन्य समोरासमोर भिडले. एकमेकांवर दगडफेक होऊ लागली, दोघांवर शिव्यांची लाखोली वाहिली जाऊ लागली. समाजात तेढ निर्माण होणारी परिस्थिती तयार झाली. प्रधान मात्र आपल्याच थाटात होता.

राजाने माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. ती मला पार पाडावी लागेलच. मग त्याचे काही दूरगामी परिणाम झाले तरी बेहत्तर असा अविर्भाव प्रधानाने ठेवला.

या सर्व प्रसंगात एकमेकांवर शाब्दिक बाण मारले जात होते; चाली खेळल्या जात होत्या, पण कोण कुठे बाण मारत आहे आणि त्याचा नेम कोणावर आहे आणि कोणाला ते बाण लागत आहेत ते सर्वसामान्यांना समजणे मुश्कील होते. जनतेचे राज्य, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही हे सर्व योग्यच. पण मात्र, या सगळ्यात राज्याची प्रजा हरवली.

कायदा सुव्यवस्था सांभाळणारा प्रधान स्वतःला कायद्याचा मोठा पंडित समजत होता. राजा, शिलेदार आणि कर्तव्यकठोर प्रधानाच्या वेठीस तर सर्वसामान्यच रगडले गेले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com