काँग्रेस कार्यकारिणी : ‘मुंबईतले हिरो, नाशिकच्या गल्लीत झिरो’

विविधा विशेष दखल
काँग्रेस कार्यकारिणी : ‘मुंबईतले हिरो, नाशिकच्या गल्लीत झिरो’

नाशिक | विजय गिते | Nashik

प्रदेश काँग्रेस (Congress) कार्यकारिणीत नाशिक जिल्ह्यातून (Nashik District) तब्बल डझनभर नेते, कार्यकर्त्यांना ‘पक्ष सेवेची’ संधी मिळाली आहे...

नव्या कार्यकारिणीत अकरा जणांना संधी मिळाली आहे. नाशिक शहराचे प्रभारी अध्यक्ष शरद आहेर (Sharad Aher) यांची यापूर्वीच प्रदेश उपाध्यपदी नियुक्ती झालेली असल्याने पक्षाला जिल्ह्यातून 12 शिलेदार प्रतिनिधी म्हणून लाभले आहेत.

पक्षाला संघटन वाढीच्या दृष्टीने विचार करता या बारा शिलेदारांची सध्याची कामगिरी आणि एकूणच त्यांचे राजकीय वलय पाहता दोन-तीन नवनियुक्त पदाधिकारी सोडता सगळ्यांचीच अवस्था म्हणजे ‘मुबंईतले हिरो, गल्लीत झिरो ’ अशीच आहे.

पक्षाने कार्यकारिणी निवडताना किमान नाशिक जिल्ह्याचा विचार करता जातीय समतोल राखलेला दिसतोय. साहजिकच मराठा पदाधिकार्‍यांची संख्या अधिक असली तरी आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गालाही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न झालेला आहे.

माजी आमदार जयप्रकाश छाजेड (Jaiprakash Chhajed), माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पाटील पानगव्हाणे (Rajaram Pangavhane) या ज्येष्ठांना उपाध्यक्षपदी बढती दिली आहे. सध्या इंटकचे प्रदेशाध्यक्ष असलेले छाजेड आणि जिल्हाध्यक्षपद गेल्यापासून पानगव्हाणे हे दोन्ही नेते जिल्हा राजकारणात किती सक्रिय आहेत हे जिल्ह्याला माहिती आहे.

असे असले तरी सावली सारखे ते कायम पक्षाबरोबर आहेत. हेच त्यांचे खरे तर मुख्य भांडवल आहे. प्रदेश प्रवक्त्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील (Dr. Hemalatha Patil) यांना सचिवपदावरून बढती मिळत सरचिटणीसपदी विराजमान केले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आक्रमकरित्या पक्षाची बाजू मांडतात.

विधानसभा निवडणुकीत भाजपशी (BJP) त्यांनी दोन हात केले आहे. मात्र, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्यात त्या अयशस्वी ठरत आल्या आहेत. माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (Dr. Shobha Bachhav) यांना सरचिटणीसपदी कायम ठेवण्यात आले असून त्यांनाही निष्ठेचे फळ मिळाले आहे.

कळवणचे माजी आमदार काशीनाथ बहिरम (Kashinath Bahiram) यांच्या सौभाग्यवती सुमित्रा बहिरम यांना सचिवपद देत पक्षाने जिल्ह्याला एक धक्काच दिला आहे. बहिरम यांचे पुत्र मयूर हे कळवणचे नगराध्यक्षही बनले. याचा फायदा काँग्रेसला उभारी मिळवून देण्यासाठी सुमित्रा बहिरम यांना संधी दिली गेली असावी.

स्व. गोपाळराव गुळवे यांच्यानंतर इगतपुरीत पक्षाची मोठी संघटनात्मक हानी झालेली आहे. ती भरून काढण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांना सचिवपदी बसवून विश्वास टाकण्याचा प्रयत्न पक्षाने केलेला दिसतो. माजी आ. निर्मला गावित (Nirmala Gavit) या पक्षाला सोडून गेलेल्या असल्याने अशा परिस्थितीत गुंजाळ यांच्यावर पक्षाला नव्याने उभा करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.

मात्र, पक्षाने संपतराव सकाळे यांच्यासारख्या निष्ठावंत, धडाडीच्या आक्रमक नेत्याकडे कानाडोळा करत गटबाजीला खतपाणीच घातलेले दिसतेय. (अर्थात सकाळे यांच्यावर पुढे जिल्हाध्यक्षपदाची माळ टाकण्यासाठी देखील आता डावलले असू शकते.) नाशिक तालुक्यातील लहवितचे उपसरंपच प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड अनेक वर्षे संघटनात्मक कामात आहेत. त्यांनाही प्रदेशवर संधी मिळाली आहे.

पक्षाबरोबरच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याबरोबर असलेल्या निष्ठेचे फळ त्यांना मिळाले आहे. नाशिक मनपाचे नगरसेवक राहुल दिवे यांनाही पुन्हा सचिवपदावर संधी मिळाली. शहराध्यपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर असतानाच त्यांना प्रदेशवर काम करण्याची संधी मिळाली आहे.

नगरसेवक शाहू खैरे (Shahu Khaire) व माजी नगरसेवक अश्विनी बोरस्ते यांना मात्र डच्चू मिळाला आहे. बोरस्ते या सध्या सक्रिय नाहीत. मात्र, खैरे पक्षाशी निष्ठावान आहे. परंतु, पक्षासाठी ते झोकून काम करत नाही,

असे असले तरी त्यांनी खैरे कुटुंबातील मनपात दोन जागा(पक्षाच्या एकूण सहापैकी) अबाधित ठेवल्या आहेत. तत्कालीन मालेगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार झेड. एम. कहांडोळे यांचे सुपुत्र रमेश कहांडोळे यांना प्रदेशावर पक्षाने संधी देत अथक पक्षकार्याचे फळ दिले आहे.

निष्ठावानांची अशीही दखल

या सर्व डझनभर नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सारासार विचार करता व इतिहास पाहता काहीना पक्षाशी असलेल्या निष्ठेचे फळ निश्चितच मिळाले आहे. यातील अनेक पदाधिकार्‍यांची नियुक्ती ही ‘मुंबईतील हिरो, मात्र गल्लीत झिरो’ असेही खेदाने म्हणावे लागेल.

अशाही परिस्थितीत पक्षाने काही खरोखर निष्ठावान, पक्षाशी बांधील असलेल्यानाही संधी देत त्यांचा एक प्रकारे गौरवच केला आहे. यामध्ये नांदगावचे माजी आमदार अनिल आहेर यांना थेट पक्षाच्या कार्यकारी समितीत घेऊन त्यांच्या आजवरच्या निःस्वार्थ कामाची पावती दिली आहे.

नांदगाव मतदारसंघात भुजबळांच्या झंझावातात काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवणे अवघड असताना आहेर यांनी केवळ पक्षच जिवंत ठेवला नाही तर नांदगाव, मनमाड पालिकांबरोबरच जिल्हा परिषदेतही पक्षाचे अस्तित्व मधल्या काळात कायम ठेवले आहे. त्यांची कन्या अश्विनी या सध्या जिल्हा परिषदेत सभापती आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल पाटील (बिरारी) यांची निवडही धक्कादायकच म्हणता येईल. पाटील हे ‘मविप्र’त प्राध्यापक असून, त्यांचे बंधू बाजार समितीचे संचालक आहेत. बागलाणचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया व ज्येष्ठ नेते विजय पंडित पाटील यांनी तालुक्यात तर पक्षाची दयनीय अवस्था करून ठेवली आहे.

शहराध्यक्ष किशोर कदम अधून, मधून झलक दाखवितात. अशा परिस्थितीत अनिल पाटील यांना पक्ष पुन्हा उभारण्याची मोठी जबाबदारी पेलावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्वच भागाला न्याय देताना पक्षाने मात्र, चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते यांच्यावर प्रदेश कार्यकारिणीत न घेता अन्यायच केला आहे.

गरज आणखी एका शस्त्रक्रियेची

अनेक वर्षांपासून शहराला हंगामी अध्यक्ष आहे. दुसरीकडे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांची कारकीर्दही उत्साह वाढविणारी नाही. अनेक तालुक्यात तर पक्षाचे अस्तित्वही दिसत नसून एकाही पंचायत समितीचा सभापती पक्षाचा नाही. त्यामुळे शहर व जिल्ह्यात संघटनात्मक बदल अपरिहार्य ठरले आहेत.

छाजेड, बच्छाव, पानगव्हाणे आदींनी अनेक वर्षे पक्षाची पदे भूषविली. पण मोठ्या प्रमाणावर संघटन करण्यात ते कमी पडले, हा इतिहास पुसता येणारा निश्चितच नाही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनेही वेळ गेलेली नसून आता अशा अवघड परिस्थितीत त्यांनी अनुभवाचा फायदा पक्षाला करवून देणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com