नाशिक | प्रतिनिधी

पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रत्येक तालुक्यात २०२२ पर्यंत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू केले जाण्याची घाेषणा केली आहे. पशु रुग्णालये राज्यातील प्रत्येक गावात नाहीत.

त्यामुळे आजारी पशुधनाला रुग्णालयापर्यंत नेणे मोठे अडचणीचे असते. आता शेतकऱ्यांची ही समस्या सुटणार असून, नि:शुल्क टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यावर, वैद्यकीय पथकासह हे फिरते रुग्णालय शेतकऱ्याच्या बांधावर पोहचणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.

पहिल्या टप्प्यात नागपूर विभागात फिरत्या १५ पशुवैद्यकीय रुग्णालयांचा प्रारंभ करण्यात आला असून, यातील तीन रुग्णालये जिल्ह्यात असतील. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. पशुपालकांचे पशुधन निरोगी ठेवण्याला या विभागाने महत्त्व दिले आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. त्यामुळे फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयाची विभागात नितांत गरज आहे. ती पूर्ण केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम असलेल्या मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गंत फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांच्या माध्यमातून थेट आजारी पशुरुग्णांवर शेतकऱ्यांच्या दारात उपचाराची सुविधा मिळणार आहे.

या रुग्णालयांच्या माध्यमातून रोगप्रतिबंधक लसीकरण करता येणार आहे; तसेच उच्च उत्पादक क्षमता असणाऱ्या वळूंच्या रेतमात्रा वापरून कृत्रिम रेतनाचीही सोय सहजरित्या उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना पशुआहार व आरोग्याबाबत तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत मार्गदर्शन करण्याचीही व्यवस्था उपलब्ध करून देणार असून, सरकारच्या विविध योजनांची माहितीसुद्धा हे पथक देणार आहे.

नाशिकलाही सुरवात

जनावरे आजारी पडल्यास त्यांना प्रत्येक वेळी दवाखान्यात घेऊन जाणे शक्य होत नसल्याने आहे त्याच ठिकाणी उपचार करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने फिरता पशुवैद्यकीय दवाखाना सुरु केला. त्याचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी. आर. नरवडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णु गर्जे, पशुधन विकास अधिकारी डॉ. महेश ठाकूर, डॉ. प्रदीप कांगणे, डॉ. दिलीप शेंगाळ, डॉ. तुषार गिते, डॉ. भगवान पाटील, उदय जाधव, सुरेश कमानकर उपस्थित होते.