सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

सद्यस्थितीत संपूर्ण शहरासोबतच सातपूर विभागातही कोविड रुग्ण गुणाकार पद्धतीने वाढत आहेत. त्यामुळे सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळेत विलगीकरण तर ईएसआय हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरु करावे, अशी मागणी नगरसेवक सलीम शेख व नगरसेवक योगेश शेवरे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

सातपूर हा कामगार वर्गाचा परिसर आहे. कामगारांची घरे अतिशय लहान व एक अथवा दोन खोल्या असलेली आहेत. त्यामुळे कामगारांच्या घरातील एखादी व्यक्ती कोविड बाधित झाल्यास त्यांना होम क्वारंटाईन होणे शक्य होत नाही. त्याचबरोबर खासगी रुग्णालयाचा आधार घेणेदेखील पैशाअभावी अडचणीचे होत आहे.

त्यामुळे सातपूरमधील जिजामाता शाळा या ठिकाणी विलगीकरण सेंटर तातडीने सुरू करावे. तसेच गंभीर रुग्णांसाठी शासनाचे राज्य कामगार विमा रुग्णालय मनपासाठी अधिग्रहित करून त्यामध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व इतर आवश्यक सुविधा निर्माण करून कोविड रुग्णांसाठी उपचार देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनावर नगरसेवक शेख,नगरसेवक शेवरे यांच्यासह मनसेचे उपाध्यक्ष सचिन सिन्हा, विजय आहिरे, योगेश लभडे, प्रकाश निगळ, सोपान शहाणे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.