राज ठाकरेंचा मनोज जरांगे पाटलांना सवाल; म्हणाले, "तुमच्या मनासारखं घडलं मग..."

मनसे प्रमुख राज ठाकरे संघटनात्मक दौऱ्यासाठी नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावर भाष्य केले.
राज ठाकरेंचा मनोज जरांगे पाटलांना सवाल; म्हणाले, "तुमच्या मनासारखं घडलं मग..."

नाशिक । Nashik

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तरी देखील मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू राहणार असे म्हटले आहे. त्यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे. तुमच्या मनासारखे घडले मग उपोषण कशाला असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे नाशिकमध्ये बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “लोकांसमोर मी सांगितलेल हे होणार नाही. राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले तेव्हा बोललेलो हे होणार नाही. हा टेक्निकल विषय आहे, कायदेशीरबाबी आहेत, असा निर्णय राज्य सरकर घेऊ शकणार नाही, त्यासाठी सुप्राीम कोर्टात जाव लागेल. अनेक प्रोसेस आहेत. मला वाटत मराठा समाजातल्या बांधवांनी याचा विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री त्या दिवशी तिथे गेलेले. विजयोत्सव साजरा झाला. कोणता विजय मिळाला? मराठा बांधव त्या मोर्चाला गेलेले, त्यांना कळलं का, काय झालं? विजय झाला, मग परत उपोषणाला कशाला बसता?” असा प्रश्न राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला.

दरम्यान, पंतप्रधानपदी कोणता नेता असावा? असा एक प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर राज ठाकरेंनी आपल्या खुमासदार शैलीत उत्तर दिले. २०१४ साली मी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला नव्हता. त्यांच्यासारखा व्यक्ती पंतप्रधानपदावर असावा, अशी फक्त इच्छा व्यक्त केली होती. यावेळी तसा काही विचार केलेला नाही. पंतप्रधानपदी कोण असावा? याची चाचपणी सुरू आहे. माझी चाचपणी झाली की सांगेन, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्यांच्या आघाडीचे काहीही भवितव्य नाही. नितीश कुमार यांच्याच आघाडीत होते. त्याचे काय झालं? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी एका व्हायरल केलेल्या व्यंगचित्राचा दाखला दिला. या व्यंगचित्रातले दोन आय काढून टाकला होता. त्यामुळेत त्यात फक्त एनडीए उरले होते.

मराठी शाळांच्या भवितव्याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मराठी शाळा सेमी इंग्रजी केल्याशिवाय त्या चालणार नाहीत. प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याला इंग्रजी यावे, असं साहजिकच वाटतं. हा वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे त्याला सामाजिक दृष्टीकोनातून पाहणे योग्य नाही. ज्यांनी सेमी इंग्रजी शाळा केल्या तेथील पटसंख्या शंभर टक्के आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी ईडी चौकशी सुरु आहे. ईडीच्या या कारवाईवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात सुरु असलेलं अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपला देखील परवडणार नाही. कारण सत्तेचा अमरपट्टा कुणीही घेऊन आलेलं नाही. उद्या सत्ता गेली तर काय होईल याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे. इंदिरा गांधींचा दाखला देत तुम्ही हे असं किती दिवस करणार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com