विकास कामांसाठी आमदारांना दोन कोटींचा निधी प्राप्त

विकास कामांसाठी आमदारांना दोन कोटींचा निधी प्राप्त

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

करोनामुळे आमदारांना वर्षाकाठी देण्यात येणारा दोन कोटी रुपयाचा निधी मिळण्यास विलंब झाला होता. मात्र, राज्याची आर्थिक परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून मागील डिसेंबर महिन्याच्या अखेरीस एक कोटीचा निधी देण्यात आला.

त्यापुर्वी नोव्हेंबर महिन्यात एक कोटीचा निधी प्राप्त झाला होता. दोन कोटींचा निधी प्राप्त झाला असल्यसाने आमदाराना आता विकास कामांचा बार उडवता येणार आहे.

शासनाकडून जिल्हा नियोजन समिती मार्फत स्थानिक विकासकामांसाठी आमदारांना वर्षाला दोन काेटी रुपयांचा निधी दिला जातो. यंदा करोनामुळे राज्यावर आर्थिक संकट होते. मात्र मिशन बिगन अंतर्गत उद्योगधंदे व व्यवसायाचे चक्र पुन्हा सुरु झाले आहे. राज्याच्या तिजोरीत महसूल जमा होत आहे.

उशीराने का होईना जिल्हा नियोजन विभागाकडे हा विकास निधी प्राप्त झाला आहे. नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी एक तर आता डिसेंबरअखेर आणखी एक असे दोन कोटी रुपये आमदार निधीसाठी प्राप्त झालेले आहेत.

आमदार निधीसाठी देण्यात येणारा दोन कोटींचा निधी, यामुळे पूर्णपणे प्राप्त झाला असल्याने, जिल्ह्यात आता आमदार निधीतील कामांना गती मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कार्यकाळात कोरोनामुळे राज्यावर आर्थिक संकट ओढावल्याने आमदारांचा विकास निधीही गोठविण्यात आला होता.

राज्य सरकारने आता आमदारांना निधी मंजूर करण्यात आला असून, जिल्हा नियोजन विभागाकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या कामांच्या प्रस्तावांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तत्पूर्वी विशेषबाब म्हणून देण्यात आलेला प्रत्येकी ५० लक्ष रुपयांचा निधी कोरोनाच्या संकटकाळात शासनाच्या निर्देशामुळे बहुतांश आमदार निधी आरोग्य यंत्रणेवर खर्च करण्यात आला आहे.

आमदारांना स्थानिक विकासकामांसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये आमदार निधी दिला जातो. त्यातील प्रत्येकी एक कोटींचा असे सुमारे १७ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यानुसार, आमदारांनी सुचविलेल्या कामांच्या मंजुरी झालेल्या आहेत. आता पुन्हा प्राप्त झालेल्या प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या कामांच्या शिफारशी केल्या जाणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com