नाशिक । प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप नेते तथा जिल्ह्याचे प्रभारी जयकुमार रावल यांनी पक्षाच्या नगरसेवकांशी वन टू वन चर्चा केली. महापालिकेतील नगरसेवकांचे काम व निवडणुकीच्या दृष्टीने करायची तयारी याबाबत बंद खोलीत त्यांनी नगरसेवकांची मते जाणून घेत त्यांना महत्वाच्या सुचना दिल्याचे समजते...

माजी आमदार वसंत गिते व सुनील बागूल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात महापालिका निवडणूक एक वर्षावर येऊन ठेपल्याने महापालिकेतील सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे.

पक्षाने माजी मंत्री जयकुमार रावल यांना नाशिक जिल्हा प्रभारी म्हणून नेमले आहे. त्यांनी देखील नाशिकच्या फेर्या वाढवल्या अाहे. रविवारी रावल यांनी पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात बैठक घेत प्रत्येक नगरसेवकाशी बंदद्वाराआड चर्चा केली.

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व नगरसेवकांची मते त्यांनी जाणुन घेतली. निवडणुकीच्या दृष्टीने रखडलेल्या महत्वाची विकास कामे व प्रकल्प मार्गी लावा, अशा सूचना त्यांनी दिल्याचे समजते.

तसेच येत्या काही दिवसात होणार्या स्थायी समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांनी एकूण पक्षीय बलाचा अंदाज घेत सत्ता हातून जाता कामं नये याबाबत रणनितीवर त्यांनी चर्चा केल्याचे कळते.

आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी काम करा याबाबत त्यांनी नगरसेवकांना सुचना दिल्या.

तसेच सभागृहात महाविकास आघाडिच्या आक्रमकतेला जशाच तसे उत्तर दया अशा सुचना त्यांनी दिल्या. पुढिल काळात संघटनात्मक बदलावर देखिल यावेळी चर्चा झाल्याचे सूत्राकडून कळते.