आमदार हिरामण खोसकर यांना 'ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड'

आमदार हिरामण खोसकर यांना 'ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड'

नाशिक । Nashik

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे (Igatpuri-Trimbakeshwar Assembly constituency) कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांना राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्डने (Rajiv Gandhi Global Excellence Award) दिल्लीत सन्मानित करण्यात आले.

समाजसेवा, शिक्षण आणि सर्जनशील कला या क्षेत्रातील योगदानाबद्दल बावीस प्रतिष्ठित व्यक्तींना राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने (Rajiv Gandhi Global Excellence Award) दिल्लीत सन्मानित करण्यात आले. राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड फाउंडेशन दरवर्षी माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हौतात्म्याचे स्मरण करून राष्ट्रीय विकासात योगदान देणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन दरवर्षी या पुरस्काराचे वितरण केले जाते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील अहमद (Senior Congress leader Shakeel Ahmed) यांच्या उपस्थितीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २२व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि.२१) आयोजित समारंभात उत्तराखंडचे राज्यपाल अझीझ कुरेशी (Governor of Uttarakhand Aziz Qureshi) यांच्या हस्ते आमदार खोसकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खोसकर इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले. महाविकास आघाडी सरकार स्थापनेपूर्वी झालेल्या आमदारांच्या फोडाफोडीत खोसकर यांना देखील आॅफर आली होती. मात्र, ही आॅफर नाकारत ते पक्षासोबत राहिले.

जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून आरोग्यदूत म्हणून खोसकर काम करत आहे. आदिवासी बांधव अथवा मतदारसंघ, जिल्हाभरातून आलेल्या रूग्णाला जिल्हा रूग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी ते स्वत: जिल्हा रूग्णालयात ठाण मांडून असतात. रूग्णांसमवेतच ते दिवाळी साजरी करतात. कोविड काळात तीनदा कोरोनाची लागन होऊन देखील ते कोविड युध्दा म्हणून मतदारसंघात अहोरात्र लोकसंपर्कात होते. तसेच मतदारसंघात केलेली विकासकामे या सर्व कामांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल आमदार खोसकर यांचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जेष्ठ नेते संपतराव सकाळे आदींनी त्यांचे कौतुक केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com