
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिककरांची गैरसोय होऊ देणार नाही, अशी भूमिका मध्य नाशिकच्या आ. देवयानी फरांदे यांनी घेतली आहे....
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जुने नाशिकमधील दहीपुल परिसर येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करताना त्या बोलत होत्या.
सध्या मेनरोड, दहीपूल परिसरातील रस्त्यांचे नूतनीकरण, गटारी तसेच पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. काम सुरू करण्यापूर्वी शहरातील लोकप्रतिनिधींना विचारात न घेता काम सुरु झाल्याच्या तक्रारी आ. फरांदे यांच्याकडे आल्या.
आ. फरांदे यांनी स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकाऱ्यांसोबत कामाची पाहणी केली. दहीपूल परिसरात रस्त्याचे काम सध्या असणाऱ्या रस्त्याच्या उंचीपासून एक मीटर खाली होणार आहे. यासाठी नव्याने गटार योजनादेखील करण्यात आली आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमुळे परिसरातील नागरिकांचे व शेकडो वर्षे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. आ. देवयानी फरांदे यांच्या पुढाकाराने जुने नाशिक भागात चार एफएसआय देऊन परिसराचा एकत्रित विकास करण्यासाठी क्लस्टर विकसित करण्याची मागणी करण्यात आली होती.
नाशिक महानगरपालिकेने टेंडर प्रक्रिया करून याबाबत सर्वे करून प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केलेला आहे. स्मार्ट सिटी योजनेतून रस्ते प्रस्तावित करताना महानगरपालिकेने पाठवलेल्या प्रस्तावाचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे स्मार्ट योजनेअंतर्गत होणारा खर्च वाया जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे.