विना अनुदानित शाळांना त्वरीत अनुदान द्या
नाशिक

विना अनुदानित शाळांना त्वरीत अनुदान द्या

आ.प्रा. फरांदे : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Kundan Rajput

नाशिक । प्रतिनिधी

मराठी शाळांना शासनाने अनुदानापासून वंचित ठेवले आहे. त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांचा समावेश होतो. अनुदाना अभावी अनेक शाळांतील शिक्षकांचे वेतन देखील होत नाही.

त्याकडे लक्ष वेधण्यासाठी गजानन खैरे हा शिक्षक अौरंगाबादहून पायी मंत्रालयाकडे निघाला आहे. सरकारने नुसत्या बैठका न घेता त्वरीत मराठी शाळांना अनुदान द्यावे अशी मागणी प्रा.देवयानी फरांदे यांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन सोमवारी (दि.१०) त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. अनुदानाच्या मागणीसाठी खैरे हे अौरंगाबादहून अन्नत्याग करुन मंत्रालयाकडे निघाले आहेत. त्यांची प्रा.फरांदे यांनी भेट घेतली. खैरे यांचे काही बरे वाईट झाल्यास त्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला.

उच्च माध्यमिक घोषित शाळांना २० टक्के, अंशत: अनुदानित शाळांना ४० टक्के अनुदान देण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री फडवणीस यांनी १३ सप्टेबर २०१९ ला निर्गमित केले होते. पण महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर अर्थसंकल्पिय अधिवेशनात बजेटमध्ये सर्व शाळांकरीता निधीची तरतूद केली.

पण प्रचलित नियमांच्या हक्कदार असलेल्या शाळांना काहीच हाती लागले नाही. अद्याप या शाळेतील शिक्षकांना वेतन देण्यात आले नाही. म्हणून नवयुग क्रांती संघटनेच्यावतीने गजानन खैरे यांनी अनुदानासाठी अन्नत्याग पायी दिंडी सुरु केली आहे. सरकारने अद्याप त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यास जीवास काही झाल्यास त्यास सरकार जबाबदार राहिल, असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रचलित शाळांना अनुदान मंजुर करावे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेला निर्णय लागू करावा. खैरे सर यांच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी.
आ. प्रा. देवयानी फरांदे
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com