नाशिकला लॉकडाऊन या संघटनेचा विराेध

निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
नाशिकला लॉकडाऊन या संघटनेचा विराेध
लॉकडाऊन

नाशिक । Nashik

रोजची वाढती करोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या बघता नाशिक शहर लॉकडाऊन (lock down) केले जावे, हा पर्याय समोर असला तरी त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ (Chagarn bhujabal) यांनी लॉकडाऊनचा चेंडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टोलवला आहे. मुख्यमंत्री ठाकरे या आठवड्यात नाशिकला भेट देणार असून ते लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय घेतील.

या पार्श्वभूमीवर दै.देशदूतने शहरातील विविध संघटनांची मते जाणून घेतली. उद्योजकांची प्रमुख संघटना असलेल्या ‘निमा’ व डॉक्टरांची संघटना ‘आयएमए’ने लॉकडाऊनला विरोध दर्शवला असून नाशिककरांनी स्वयंशिस्त पाळल्यास करोना संकटाला हरवता येईल अशी भूमिका मांडली. तर व्यापारी व केमिस्ट ड्रगिस्ट संघटनेने लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी केली आहे.

उद्योग क्षेत्रासाठी लॉकडाऊन हा हितावह नाही. कंपन्या बंद राहिल्या तर हजारो कामगारांची रोजीरोटी बंद होईल. शिवाय अनेक कंपन्यांनी कर्ज काढून घडी बसवली आहे. पुन्हा लॉकडाउन झाला तर उद्योग धंदे पुन्हा उभे राहणार नाही. एका मोठ्या उद्योगावर अनेक लहान उद्योग अवलंबून असतात. त्यांच्यावर देखील विपरीत परिणाम होतील. लॉकडाऊन हा सरसकट ऐवजी जेथे रुग्ण आढळतील त्या भागापुरता मर्यादित असावा.

- शशिकांत जाधव, अध्यक्ष निमा

लॉकडाऊन हा काही पर्याय असू शकत नाही. करोनाला लॉकडाऊनने अटकाव घालता येणार नाही. किती दिवस दुकाने बंद ठेवायची. लॉकडाऊन ऐवजी नाशिककरांनी स्वयंशिस्त पाळल्यास करोनाचा संसर्ग सहज टाळता येईल.

- भगवंतराव मिठाईवाले

मेडिकल दुकाने हे अत्यावश्यक सेवेत येतात. त्यामुळे लॉकडाऊन जारी झाला तरी आम्हाला दुकाने सुरु ठेवावी लागतील. शहर व जिल्ह्यात रोज 500 पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहे. ते बघता लॉकडाऊन गरजेचा आहे.

- राजेंद्र धामणे, सचिव, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन

करोनाची वाढती रुग्णसंख्या अटोक्यात आणण्यासाठी शंभर टक्के लॉकडाऊन केला पाहिजे. औरंगाबादप्रमाणे मेडिकल दुकाने देखील बंद ठेवली पाहिजे. मेडिकल व अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक घराबाहेर पडून विनाकारण गर्दी करतात असा अनुभव आहे. ते बघता लॉकडाऊनला आमचा पाठिंबा आहे.

- गोेरख चौधरी, अध्यक्ष, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

लॉकडाऊनचा निर्णय घेण्याअगोदर प्रशासनाने व्यापार्‍यांशी चर्चा करावी. अत्यावश्यक सेवा म्हणून आम्हाला दुकाने सुरु ठेवावी लागतात. औरंगाबादमध्ये किराणा दुकानदार पॉझिटिव्ह झाले. हा धोका पाहता आम्ही दुकाने बंद ठेवण्यास तयार आहोत. आर्थिक चक्रापेक्षा माणसे जगली पाहिजे. लॉकडाऊनला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे.

- प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटना

करोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. पुढील काळात करोना हा वाढतच जाणार आहे. मोठे मोठे देश देखील करोनाशी हरले. बेड व रुग्णालयाद्वारे आपण करोनाला हरवू शकत नाही. सरकारला दोष देण्याऐवजी नाशिककरांनी स्वयंशिस्त पाळणे हा एकमेव उपाय आहे.

- समीर चंद्रात्रे, अध्यक्ष, आयएमए नाशिक

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com