मिशन झिरो नाशिक
मिशन झिरो नाशिक
नाशिक

‘मिशन झिरो’: साडेआठ हजार नागरिकांच्या चाचण्या

अँटिजेन चाचणीत सातशे करोनाबाधित

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रात करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातील बंदीच्या उपायानंतर आता महापालिकेकडून गेल्या बुधवारपासून सुरू झालेल्या ‘मिशन झिरो’ला चांगले यश मिळत असल्याचे समोर आले आहे.

यात शहरात वाहनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या दवाखान्यात जवळपास ८ हजार ८०० नागरिकांच्या अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या असून यात ७०० पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या चाचण्यांमुळे बाधित रुग्णांकडून होणारे संक्रमण टाळण्यात महापालिकेला यश आले आहे.

नाशिक महापालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व इतर स्वयंसेवी संस्थांकडून महापालिका क्षेत्रात ‘मिशन झिरो’ सुरू करण्यात आले आहे. या एकात्मिक कार्यक्रमाअंतर्गत शहरातील करोना प्रतिबंधित क्षेत्र, झोपडपट्टी परिसरात २० वाहनांद्वारे फिरत्या दवाखान्यातून नागरिकांची आरोग्य तपासणी व अँटिजेन चाचणी सुरू करण्यात आली आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना करोनाशिवाय इतर आजारांवरील औषधोपचार मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने आणि करोनाचा प्रसार करणार्‍या रुग्णांना तत्काळ शोधून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यासाठी हे फिरते दवाखाने महत्त्वाचे ठरले आहेत.

या झिरो मिशनअंतर्गत नवीन नाशिक परिसरातील प्रतिबंधित क्षेत्र, पंचवटीतील फुलेनगर, नवनाथनगर, मायको दवाखाना, संजयनगर, हिरावाडी, विडी कामगारनगर, गंजमाळ झोपडपट्टी परिसर, पाथर्डी गाव परिसर अशा वीस भागात आता दवाखाने उपलब्ध करून देत डॉक्टरांच्या पथकांकडून नागरिकांची आरोग्य तपासणी करताना इतर आजारांवरील औषधे देण्यात आली. तसेच यात प्रतिबंधित क्षेत्र व झोपडपट्टी भागातील नागरिकांची अँटिजेन तपासणीदेखील करण्यात आली.

मनपाला पुन्हा २५ हजार किट

नाशिक महपालिका क्षेत्रातील करोना संसर्ग रोखण्यासाठी आयसीएमआरकडून पहिल्या टप्प्यात चार हजार अँटिजेन टेस्ट किट मिळाले होते. त्यानंतर महापालिकेने २० हजार अँटिजेन टेस्ट किट खरेदी केल्या होत्या. या किटचे विविध विभागात वितरण करण्यात येऊन याचा वापर झाला. आता महापालिका प्रशासनाने पुन्हा २५ हजार अँटिजेन टेस्ट किट खरेदी केले आहेत.

हे सर्व किट महापालिकेला प्राप्त झाले असून याचा वापर आता महापालिका रुग्णालये व २० मोबाईल डिस्पेन्सरी या ठिकाणी केला जाणार आहे. करोना प्रादुर्भाव रोखताना बाधा झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तत्काळ चाचणी करून त्यांच्याकडून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही अँटिजेन चाचणी प्रभावी ठरत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com