आज पासुन मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिम
नाशिक | प्रतिनिधी
बालकांमधील मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. मात्र नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात.असे आढळुन आले आहे.
केंद्रशासनाने डिसेंबर 2023 पर्यंत गोवर रुबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासाठी केंद्र शासनाने माहे ऑगस्ट २०२३ पासून ३ फेर्यांमध्ये सर्व जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष ५.० कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने नाशिक जिल्हयामध्ये देखील ऑगस्ट पासून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत लसीकरणपासून पुर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचे व गरोदर माता यांचे आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, नर्सिंग स्टाफ मार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला आहे. शिल्लक राहिलेले बालके आणि गरोदर माता यांचे लसीकरण या मोहिमे अंतर्गत करण्यात येणार आहे.
सदर मोहिम १०० टक्के यशस्वी होणेसाठी तसेच प्रभावीपणे अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, डॉ.हर्षल नेहेत,डॉ.प्रकाश नांदापूरकर व सहकारी प्रयत्नशील आहेत. पहिला टप्पा ७ ते १२ ऑगस्ट , दुसरा टप्पा ११ ते १६ सप्टेंबर आणि तिसरा टप्पा ९ ते १४ ऑक्टोबर राबविण्यात येईल.