
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी 'मिशन भागिरथी' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेतून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून 12 तालुक्यांमध्ये जलसंधारणाची 600 कामे होणार आहेत. या कामांची रक्कम जवळपास 100 कोटी रुपये असून या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 12 तालुक्यांमधील 150 गावांमध्ये पाच ते 30 लाख रुपयांदरम्यान बंधारे बांधले जाणार आहेत. त्यामुळे ही गावे टंचाईमुक्त होतील, असा अधिकार्यांना विश्वास आहे.
जिल्हा नियोजन समितीकडून जलसंधारण विभागाला दरवर्षी साधारणपणे 15 कोटींचा निधी येतो. त्यातून पुरेशी कामे होत नाहीत. मात्र यंदा जिल्हा परिषदेच्या या अभिनव योजनेमुळे रोजगार हमी योजनेतून दरवर्षी जवळपास 100 कोटींची जलसंधारणाची कामे होऊन सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरगाणा तालुक्यातील काही गावांच्या सरपंचांनी विकास होत नसल्यामुळे गुजरात राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींची धावपळ उडाली होती. पालकमंत्री दादा भुसे यांनी सुरगाणा तालुक्यातील गावांचे सरपंच व प्रशासन यांची बैठक घेऊन सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्याचा दौरा करून तेथील माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य, कृषी, रस्ते, पायाभूत सुविधा यांचा आढावा घेतला. यामुळे सुरगाणा तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एक आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना दिल्या असून तो आराखडा अंतिम टप्प्यात आहे.
पावसाळ्यानंतर सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे त्या तालुक्यातून रोजगारासाठी स्थलांतर होत असल्याचा मुद्दा समोर आला. हा केवळ सुरगाणा तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण आदिवासी भागाचा प्रश्न असल्यामुळे त्यांनी रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाच्या सुविधा उभारण्यासाठी मिशन भागिरथी हा उपक्रम राबवण्याच्या सूचना जलसंधारण विभागाला दिल्या. त्यानुसार जलसंधारण विभागाने सर्व तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करून नाल्यांवर बंधारे बांधण्यासाठीची ठिकाणे निश्चित केली आहेत.
त्यात सुरगाणा, पेठ, बागलाण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव व मालेगाव या तालुक्यांमधील 150 गावे निश्चित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये पाच ते सहा बंधारे बांधण्यात येणार आहेत. यात पाच ते 30 लाख रुपयांच्या मर्यादेत गरजेनुसार बंधार्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांचा ग्रामपंचायत विभागाकडून रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात समावेश करण्यात आला असून पुढील आठवड्यात या कामांना ग्रामपंचायत विभागाकडून प्रशासकीय मान्यता दिल्या जातील व मार्चपासून या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.