बेपत्ता वृद्धाचा समाजमाध्यमांतून लागला तपास

शिक्षक संघटना व पोलीस पाटीलांची तत्परता
बेपत्ता वृद्धाचा समाजमाध्यमांतून लागला तपास

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुक्यातील खंबाळे ( Khambale ) येथून बेपत्ता झालेल्या एका वयोवृद्धाचा समाज माध्यमामुळे (social media) तपास लागला. शिक्षक संघटना व पोलीसपाटलांच्या तत्परतेने या वृद्धास सुरक्षितपणे घरी आणण्यात यश मिळाले.

खंबाळे येथील धोंडीबा हनुमंता जेडगुले हे चार महिन्यांपूर्वी गावातून बेपत्ता झाले होते. तीन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तराळा येथे बसस्थानकावर चहाच्या टपरीवर काही शिक्षक चहा पित होते. यावेळी त्यांना एक वृद्ध नजरेस पडले. शिक्षकांनी त्यांची विचारपूस केली असता ते आपल्या बोलण्यातून फक्त सिन्नर असा उल्लेख करत होते.

शिक्षकांनी लागलीच आपल्या संघटनेच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर वृद्धाचा फोटो व माहिती टाकली. सिन्नर तालुक्याचा उल्लेख असल्यामुळे संबंधित शिक्षकांच्या परिचयाचे खंबाळे येथील पोलीसपाटील भारत बोर्‍हाडे यांनी हे बघितले असता त्यांनी तत्काळ याबाबत वृद्धाचे नातेवाईक अशोक गंपले यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ नाशिक जिल्हाध्यक्ष अरुण पाटील बोडके त्यांना फोन करून मदत मागितली.

बोडके यांनी तत्काळ याबाबत रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्याकडे याबाबत विचारणा करून गावाबद्दल माहिती घेतली. पाटील यांनी तराळे गावच्या पोलीसपाटील वैशाली सुर्वे त्यांचा मोबाईल क्रमांक पाठवून माहिती घेण्यास सांगितली. बोर्‍हाडे यांनी पोलीसपाटील सुर्वे यांना फोन लावत सर्व हकीकत सांगितली. सुर्वे यांनीही क्षणाचा विलंब न करता बसस्थानक परिसरात जाऊन वृद्धाचा शोध घेतला. यावेळी सुर्वे यांंनी बोर्‍हाडे यांना फोन करून वृद्धाची ओळख पटवून घेतली व त्यांना आपल्या घरी घेऊन गेल्या.

तेथे वृद्धाला नवीन कपडे व जेवणाची व्यवस्था करत पोलीसपाटील बोर्‍हाडे यांना गावचा येण्याचा मार्ग सांगितला. त्याप्रमाणे बोर्‍हाडे व वृद्धाचे नातेवाईक गंपले यांनी तेथे जाऊन वृद्धाला ताब्यात घेत सुखरूप गावी परतले. शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि पोलीसपाटील संघटनेने आपसात समन्वय साधून तत्परता दाखवल्याने वृद्धाला पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात यश आले. यामुळे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व पोलीसपाटील संघटनेचे सर्वांनी कौतुकही केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com