जनशिक्षण संस्थानच्या कार्याची मंत्रालयाकडून दखल
नाशिक

जनशिक्षण संस्थानच्या कार्याची मंत्रालयाकडून दखल

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मविप्र संचलित जनशिक्षण संस्थानमार्फत करोनाच्या संकटात गरजू घटकांना मोफत कापडी मास्क, सुमारे दोन हजार फेसशिल्ड, सॅनिटायझर, साबण व हॅन्डवॉश यांचे वाटप करण्यात आले. केंद्राच्या कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्रालयाने या कामाची दखल घेऊन त्यांचे कौतुक केल्याची माहिती संस्थानच्या संचालक ज्योती लांडगे यांनी दिली.

मोठ्या प्रमाणात मास्कची निर्मिती केल्याबद्दल केंद्राच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाकडून संस्थेचा गौरव करण्यात आला. मास्क निर्मितीच्या कामातून संस्थेने महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. मास्क निर्मिती कामात शहर व ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थी, लाभार्थी, मार्गदर्शक प्रशिक्षक यांनी काम केले. रस्त्यावर दिवसरात्र समाजाची सेवा करणारे पोलीस अधिकारी, हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस, जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवक, स्वयंसेवी संस्था, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, घंटागाडी, सफाई कामगार, भाजीपाला विक्रेता, रेडक्रॉस सोसायटी, संस्थेचा सेवकवर्ग, बँकेतील सेवकवर्ग, रोजगार हमीतील पेठ, सुरगाणा या आदिवासी भागातील मजूर आदी क्षेत्रातील गरजूंना मोफत मास्क वाटप करण्यात आले.

संस्थेच्या या कार्याची दखल घेऊन नवी दिल्ली, भारत सरकार, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्रनाथ पाण्डेय यांनी संस्थेला गौरवपत्र पाठवले आहे. या उपक्रमांकरिता जनशिक्षण संस्थानचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थानने महिलांनी बनवलेल्या मास्कचे वाटप करण्यासाठी संस्थानच्या संचालिका ज्योती लांडगे, कार्यक्रम अधिकारी प्रकाश नाठे, सहायक कार्यक्रम अधिकारी संगीता देठे, संदीप शिंदे, दत्तात्रय भोकनळ, सुकदेव मत्सागर, मनोज खांदवे, प्रताप देशमुख आदींनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार यांनी अभिनंदन केले.

खासदार स्व. वसंत पवार यांच्या संकल्पनेतून महिलांना स्वबळावर व्यवसायाची उभारणी करण्याच्या उद्देशाने २५ वर्षांपूर्वी जनशिक्षण संस्थानची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून ७० हजार महिलांनी प्रशिक्षण घेतले असून त्यापैकी बहुतांश महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. तसेच जनशिक्षणच्या माध्यमातून प्रशिक्षण, प्रबोधन व प्रदर्शन अशा वेगवेगळ्या प्रकारातील भरीव कार्य यशस्वीपणे सुरू आहे. तसेच करोना काळातील भरीव कामगिरीबद्दल केंद्राकडून मिळालेली कौतुकाची थाप आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा देईल.

- नीलिमा पवार, सरचिटणीस, मविप्र

Deshdoot
www.deshdoot.com