प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कारागिरांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवावी - डॉ. भारती पवार

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कारागिरांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवावी - डॉ. भारती पवार

नाशिक | प्रतिनिधी

भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ’प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने’ चा शुभारंभ नवी दिल्ली येथे करण्यात आला आहे. योजनेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील सर्व कारागिरांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने गावामधील शेवटच्या गरजू घटकांपर्यंत ही योजना पोहचविण्यात यावी, असे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

आज भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण कालिदास कलामंदिर येथे प्रक्षेपित करण्यात आले होते. या आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉ पवार बोलत होत्या.

पवार म्हणाल्या, विविध प्रकारच्या पारंपरिक व्यवसायातील कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक योजना ही लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वय व सहकार्यातून यशस्वी होत असते.

या योजनेच्या माध्यमातून १८ प्रकारचे विविध पारंपरिक व्यवसाय पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. तसेच या योजने अंतर्गत २०२७-२८ पर्यंत देशातील साधारण ३० लाख कारागिरांना लाभ देण्यात येणार आहे.

प्रास्ताविक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. तर, फरांदे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार, नाभिक असे विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिंचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तर प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, एनएचएआय नाशिक चे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, एनएचएआय नाशिक चे व्यवस्थापक डी. आर. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध व्यवसाय करणारे कारागीर उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com