बोधी वृक्षारोपण महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करावे - मंत्री छगन भुजबळ

बोधी वृक्षारोपण महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करावे - मंत्री छगन भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात २४ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात येणार आहे. या बोधी वृक्षारोपणाच्या महोत्सवासाठी देश विदेशातून उपासक येणार असल्याने त्यासाठी आवश्यक सोयी-सुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

भुजबळ फार्म येथे झालेल्या बोधी वृक्षारोपण महोत्सव नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, बोधी वृक्षाच्या फांदी रोपण महोत्सवाचे नाशिक शहरात महिनाभरासाठी आयोजन करण्यात येणार असून या महोत्सवासाठी दलाई लामा तसेच श्रीलंकेचे पंतप्रधान, कंबोडियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यासह थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम या देशातील भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी देशविदेशातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याने तेथील सुरक्षा व्यवस्थेवर भर देण्यात यावा. तसेच ऐतिहासिक महत्व असणाऱ्या बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण झाल्यावर त्या फांदीच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी तेथे पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात यावी.

त्याचप्रमाणे या महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाच्या जागेचे सपाटीकरण करण्यात यावे. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व महानगरपालिका तसेच या कार्यक्रमाचे आयोजक शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या समन्वयाने कार्यक्रमाची नियोजन समिती तयार करावी. तसेच बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण ज्या ठिकाणी करण्यात येणार आहे, तेथील मातीचे तज्ज्ञामार्फत परिक्षण करवे.

साधारण पंचवीशे वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदीच्या काठावर बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाल्याने हे बोधीवृक्ष अतिपूजनीय असून या बोधी वृक्षाच्या एका फांदीचे रोपण आपल्या नाशिक शहरात होत असल्याने आपल्या जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्व अजून वाढणार आहे.

या अनुषंगाने बोधी वृक्षारोपणाच्या महोत्सवाचे महत्व लक्षात घेवून त्यादृष्टीने बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, विविध ठिकाणांहून येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन, सुरक्षा व्यवस्था व इतर अनुषंगिक आवश्यक सोयी-सुविधांचे नियोजन २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याबाबतच्या सूचना ही मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकारी यांना दिल्या.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार ॲड.राहुल ढिकले, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मोनिका राऊत, शहर अभियंता एस. आर. वंजारी, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भिक्कू सुगत थेरो, नियोजन समितीचे समन्वयक आनंद सोनवणे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com