दिंडोरी तालुक्यातील दुध व्यावसायिक आर्थिक संकटात

शेती जोड धंदा बळीराजांला साथ देईना
दुध
दुधदिंडोरी तालुक्यातील दुध व्यावसायिक आर्थिक संकटात

ओझे | Ojhe वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील ओझे व परिसरातील दुध व्यावसायिकांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळल्याने तसेच जोड धंद्याने साथ सोडल्याने बळीराजां आर्थिक विवंचनेत सापडला आहे. रब्बी हंगाम व खरीप हंगामातील अनेक संकटाचा सामना करून शेतकरी वर्ग आता कुठे तरी आपली विकासाची पाऊले टाकत असतांना शेतकरी वर्गावर परत एक नवीन कृत्रिम संकट उभे राहिले आहे. ते म्हणजे दुध व्यवसायाला लागलेले कमी भावाचे ग्रहण.

शेतामध्ये पिकविलेल्याला कोणत्याही पिकाला हमी भाव मिळत नसल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजांला जोड धंदा म्हणून दुध व्यवसाय आधार देत होता. परंतु अलीकडील काळात दुध व्यवसायाला कोणत्याही प्रकारचा हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शासनाकडून दुध व्यवसायाला जी सवलत मिळते. त्या सवलती मध्ये दुध व्यवसायावर खर्च सुध्दा भागत नाही.

तालुक्यातील बरीच शेतकरी दुध व्यवसायाकडे वळाला आहे. करोना च्या अगोदर काळात शेतकरी वर्गाला दुधाने चांगला भाव प्राप्त करून संकटातून तारूण नेले होते. परंतु आता दुधाला रस्त्यावर फेकण्याची वेळ बळीराजांवर आली आहे. भर श्रावणात दुधाला योग्य सवलत मिळत नसल्यामुळे बळीराजां आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

ग्रामीण भागात जोड धंद्याला शेतकरी वर्गाकडुन आधिक पसंती दिली जाते. त्यामध्ये शेती पुरक जोड धंदा, शेती संलग्न जोड धंदा, शेतीसाठी भांडवल तयार करून देणारा जोड धंदा, इ. जोड धंद्याना शेतकरी वर्गातून मोठी पसंती असते. परंतु यामध्ये दुध व्यवसायाला शेतकरी वर्गाने जवळ जवळ ७० ते ८० टक्के पसंती दिलेली आहे.

अगोदरच्या काळात दुधाला शासनाने चांगला भाव व चांगली सवलत दिल्यामुळे शेतकरी वर्गाने वेगवेगळ्या ठिकाणीच्या बॅंकांचे, सोसायटीचे, फायनान्स इ. ठिकाणीहुन कर्ज काढून जास्त दुध देणारी प्रवर्गातील गाई, म्हैस खरेदी करून शेतकरी वर्गाने दुध व्यवसाय फुलवला होता.

दिंडोरी तालुक्यात मोठ मोठ्याला कंपन्या असल्यामुळे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या भागात दुध व्यवसाय चांगला तेजीत होता. परंतु कोरोना मुळे अनेक कंपन्या लाॅक डाऊन ची घोषणा केल्या मुळे बंद करण्यात आल्या.

त्यामुळे बरीच कामगारांनी गावाकडील वाट धरल्यामुळे दुधाला खरेदी करण्यासाठी ग्राहक वर्ग कमी पडला.त्यामुळे दुध व्यवसायासाठी जे कर्ज घेतले आहे.ते कसे फेडावे असा सवाल शेतकरी वर्गासमोर आ वासून उभा राहिला आहे.

१) दुधाला प्रतिलिटर सरसकट ३० रू.च्या वर भाव मिळावा.

२) गायीच्या दुधाला सरकट १० रू.च्या वर अनुदान मिळावे.

३) दुध भुकटीला निर्यातीसाठी ५० रु.च्या वर अनुदान मिळावे.

या मागणी जोर धरीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com