पाण्याचे सुक्ष्म नियोजन करावे- जि.प.सीईओंचे आदेश

जिल्हा परिषद
जिल्हा परिषद

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई व अल निनोमुळे उद्भवू शकणा-या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व गट विकास अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता यांची दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेतली.

या बैठकीमध्ये आपल्या तालुक्यातील सर्व गावांमध्ये पाणी टंचाईसंदर्भात कुठलीही समस्या उद्भवणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गट विकास अधिकारी व उपभियंता यांना दिले असून ग्रामीण भागात कोणत्याही गावात पाण्याची समस्या भेडसावू नये यासाठी सूक्ष्म नियोजन करावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या बैठकीत सांगितले.

त्याअंतर्गत टंचाई कालावधीत ज्या उद्वभवावरून (पाणी घेण्याचे ठिकाण) पाण्याची उपलब्धता होणार आहे त्याची निश्चिती करून सोर्स मॅपिंग करावे, प्रगतीपथावर असलेल्या नळयोजना पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, नळ योजनांची दुरुस्ती करावी, विंधन विहीर खोलीकरण करावे ज्या भागात सार्वजनिक विहिरी या आटल्या असतील अशा ठिकाणी खाजगी विहिरी अधिग्रहित कराव्यात, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

अल निनोच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या टंचाई आराखड्याबाबत देखील चर्चा करण्यात आली, या आराखड्याचे सूक्ष्म नियोजन तयार करून जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संभाव्य टंचाई आढावा बैठकीत या सूक्ष्म नियोजन आराखड्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांना या संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत, त्यानुषंगाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणी टंचाई संदर्भात सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

या बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, शाखा अभियंता विनोद देसले, वरिष्ठ सहायक प्रदीप अहिरे, टंचाई लिपिक अमित आडके यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com