निफाड @६.५ अंश सेल्सियस; थंडीचे कारण असे की...

निफाड @६.५ अंश सेल्सियस; थंडीचे कारण असे की...

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या आठवड्याभरापासून नाशिकच्या निफाडमधील तपमान कमीकमी व्हायला सुरुवात झाली आहे. दवबिंदू गोठेपर्यंत इथले तपमान खाली येत असते. आज हंगामातील सर्वात नीचांकी तपमानाची नोंद आज निफाडच्या गहू संशोधन केंद्रावर झाली आहे. आज तपमानाचा पारा ६.५ अंशांपर्यंत खाली आला....

निफाडमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद का होत असावी असा प्रश्न अनेकांना पडतो. नाशिकचे हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुका समुद्र सपाटीपासून ५६९ मीटर उंचीवरील सखल भूभाग असून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे उंच डोंगर किंवा पर्वत इथे नाहीत.

तसेच समतल भागावर हवेची घनता जास्त आढळून येते, याठिकाणी हवेचा थर साठून राहतो. जास्त घनतेची हवा ही जास्त दाबाचा भाग बनवत असते. जास्त दाबाचा भाग म्हणजेच कमी तापमान असे सूत्र आहे. परिणामी, निफाडचे तापमान नाशिकमध्ये नेहमीच कमी आढळते.

या व्यतिरिक्त निफाडमध्ये हिरवीगार झाडे आणि बागायती शेतीची पिके (द्राक्ष, ऊस, कांदा, गहू, डाळिंब) यांची रेलचेल आहे. जी पिके निफाडमध्ये जास्त दाबाचा हवेचा थर टिकवून ठेवते. थंड हवेमुळे आणि काळ्या कसदार जमिनीमुळे निफाड मध्ये दीपावलीनंतर लागवड होणारा रब्बी हंगामातील गहू देखील चांगल्या प्रकारे पिकतो.

निफाड मध्ये वाऱ्यांची गती देखील कमी आढळते जी तापमान कमी ठेवण्यास पूरक आणि महत्वाचा भाग ठरते. निफाडला गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. त्यामुळे मोठा जलसाठा जमिनीत होतो. निफाड मध्ये पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे जी जमिनीचे तापमान कमी ठेवण्यास उपयोगी ठरतो आणि परिणामी हवेचे तापमान देखील घटते.

निफाड मध्ये आकाश निरभ्र असते त्यामुळे दिवस जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता लवकर हवेत फेकली जाते आणि जमिनीलगतचा तापमान वेगाने घटते आणि थंडी वाढते. निफाडचे सध्याचे तापमान ६.५ अंश सेल्सिअस इतके पोहोचले आहे. मात्र, येत्या काळात ते अजून घसरुन 4 अंश सेल्सिअसच्या नजिक पोहोचण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com