गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील; सेना नेत्यांचा इशारा

गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील; सेना  नेत्यांचा इशारा

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashik Road

शिवसेनेशी (Shivsena) गद्दारी करणाऱ्या ना शिवसैनिक व मतदार धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा देवळाली गाव (Deolali gaon) येथे आयोजित केलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेना मेळाव्यात उपस्थित नेत्यांनी दिला...

दहा ते पंधरा दिवसापूर्वी येथील प्रभाग क्रमांक २१ चे शिवसेना नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खोले तसेच माजी नगरसेवक प्रताप मेहरोली, तर प्रभाग १९ च्या नगरसेविका जयश्री खर्जुल, राजू लवटे, श्याम खोले आदींनी शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे नाशिकरोड (Nashik Road) शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला अशी चर्चा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक २१ व २२ मधील ठाकरे गटातील निष्ठावंत शिवसैनिकांची बैठक देवळाली गाव येथील यशवंत मंडईमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केल्याने बैठकीचे रूपांतर मेळाव्यात झाले. तसेच लवटे बंधूंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या यशवंत मंडईमध्ये (Yashwant Mandi) हा मेळावा आयोजित करण्यात आल्याने या मेळाव्याकडे संपूर्ण नाशिकरोड वासियांचे लक्ष लागले होते.

तसेच या मेळाव्याच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मेळाव्यास शिवसेना (ठाकरे गट) उपनेते बबनराव घोलप, सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, विनायक पांडे, वसंत गीते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर या सर्व नेत्यांनी बंडखोरी करणाऱ्या व शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांवर टीकेची झोड उठविली.

ज्या शिवसैनिकांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांना आगामी निवडणुकीत शिवसैनिक व मतदार धडा शिकवतील. त्याचप्रमाणे या प्रभागात पुन्हा गद्दारांचा पराभव करून शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली ते संपले आहे. तसेच ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासोबत कोणीही निष्ठावंत शिवसैनिक गेला नाही. खरा व निष्ठावंत शिवसैनिक हा समोर बसलेला असून सर्व शिवसैनिकांनी एकजुट ठेवून आगामी काळात महापालिकेवर भगवा फडकवा असे आवाहनही या मेळाव्यात करण्यात आले.

दरम्यान, यावेळी जयंत गाडेकर, सुधाकर जाधव आदींची भाषणे झाली. तर मेळाव्याचे सूत्रसंचालन योगेश गाडेकर व स्वप्निल आवटे यांनी केले. याप्रसंगी माजी नगरसेवक संतोष साळवे. सुनिता कोठुळे, रंजना बोराडे, प्रशांत दिवे, माजी आमदार योगेश घोलप, मंगला आढाव, शिवसेना महिला आघाडीच्या भारती ताजनपुरे, शोभा मगर, पद्मा यांच्यासह ठाकरे गटातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com