
नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यास पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार महापालिका, पोलीस, महसूल, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक निमा हाऊस येथे झाली.
यावेळी व्यासपीठावर महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, सचिव राजेंद्र अहिरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कामगार उपायुक्त विकास माळी, अधीक्षक अभियंता एमआयडीसी बाळासाहेब झांज्जे, जिल्हा उद्योग केंद्र सहसंचालक शैलेंद्र राजपूत, विद्युत मंडळाचे माणिकलाल तपासे उपस्थित होते.
यावेळी प्रास्तविकातून निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी औद्योगिक वसाहतीतील समस्या उपस्थित अधिकार्यांसमोर मांडल्या. यावेळी मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडावर यांनी अंबड औद्योगिक वसाहतीतील दुहेरी फायरसेसचा प्रश्न मार्गी लागला असून एक एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल तसेच शहरात गॅस पाईपलाईन जाळे होणार आहे. चुकीची कामे करू नका, असे मोबाईल कंपन्यांना सांगितले आहे.
तुमचे काम करताना दुसर्या युटिलिटीला तडे नको, असे त्यांना बजावले आहे. सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा. एलबीटीचे परतावे लवकर होतील, असेही ते म्हणाले. जाचक मालमत्ता कराबाबत बोलताना इंडस्ट्रीयल स्लॅब करू, असे सांगितले. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले की, अंबड पोलीस ठाण्याचे लवकरच विभाजन होऊन नवीन पोलीस ठाणे निर्माण होईल. सर्वांनी नियम पाळल्यास वाहतूक समस्येला आळा घालणे शक्य होईल.
यावेळी चर्चेत मधुकर ब्राह्मणकर, जयप्रकाश जोशी, सतीश कोठारी, राजेंद्र फड, अतुल भदाणे, यतीन पटेल, संजय सोनवणे, मनीष रावल, बबन चौरे, नितीन आव्हाड, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, समीर पटवा, विनायक गोखले आदी उद्योजकांनी सहभाग घेतला. यावेळी निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी, निमाचे सचिव हर्षद ब्राह्मणकर मिलिंद राजपूत, रवींद्र झोपे, संजय सोनवणे, श्रीधर व्यवहारे, जयंत जोगळेकर, मनीष रावल, सुधीर बडगुजर, आयमाचे उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे, हेमंत खोंड आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.