महापौरांची नाशिक शंभर टक्के लाॅकडाऊनची मागणी

पालकमंत्री भुजबळांना पत्र : तातडीने निर्णय घ्यावा
महापौरांची नाशिक शंभर टक्के लाॅकडाऊनची मागणी

नाशिक । Nashik

करोना रुग्णांची संख्या गुणाकाराने वाढत असून बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा प्रचंड तुटवडा आहे.

मृत्यूदरातही वाढ झाली असून अत्यंविधीसाठी अमरधाममध्ये वेटिंग आहे. एकूणच सर्व परिस्थिती हाताबाहेर जात असून आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी नाशिक शहर शंभर टक्के लाॅकडाऊन करा अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

पालकमंत्री भुजबळ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरातील करोना संसर्गाची परिस्थिती जवळपास हाताबाहेर जात असल्याने वैदयकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे.

शहरातील ऑक्सीजन व व्हेंन्टीलेटर बेडची संख्या मर्यादीत असल्याने व त्या तुलनेत रुग्णांची संख्या मोठयाप्रमाणात वाढत असून उपचार करण्यास प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशाही परिस्थितीत प्रशासन व पदाधिकारी सातत्याने योग्य प्रकारे कामकाज करीत आहे . शहरातील रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर , नर्स व इतर वैदयकीय स्टाफ करोना बाधित होत असुन त्यांना जीव गमवावा लागत आहे.

सदयस्थितीत रॅपिड ऍन्टीजन टेस्ट , आरटीपीसीआर , एचआरसीटीसी तपासणीकरिता नागरिकांच्या रांगा कमी होतांना दिसुन येत नाही. त्यामुळे टेक्निशियन स्टाफवर दबाव निर्माण होउन हॉस्पिटल प्रशासन यंत्रणेवर प्रचंड प्रमाणात ताण निर्माण झालेला आहे . शहरातील सर्वच स्मशानभूमी अहोरात्र धगधगत असुनही मृतांच्या अंत्यविधी करीता नातेवाईकांना वाट पहावी लागत आहे . याचबरोबर रेमडीसीवर व इतर तत्सम औषधे मिळविण्याकरीता नातेवाईकांची होणारी धावपळ व गर्दी हे सामाजिक प्रसारण ठरत आहे.

या लाटेत आता वृध्दांबरोबर तरुण व लहान मुले ही बाधीत होउन ते आपला जीव गमवीत आहे. कुटुंबातील कर्ता माणूस गेल्याने कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे शहरातील व्यापार काही दिवस थांबल्यास निश्चितच करोनाची साखळी तोडण्याच्या प्रयत्नास यश मिळणार आहे.

काही दिवसांकरीता आर्थिक व्यवहार जरी थांबणार असला तरी त्यात नाशिककर मात्र जगेल अशी आशा आहे . सामाजिक जबाबदारी म्हणून व्यवसाय थांबवणे हे गरजेचे व अत्यावश्यक असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे. आपण जिल्हयाचे पालकमंत्री या नात्याने आपणास ही सर्व परिस्थिती ज्ञात आहेच.

शंभर टक्के लाॅकडाउनचा निर्णय तातडीने आपल्या स्तरावरुन घेण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com