परीक्षांबाबत 'मासू'ची सर्वोच्च न्यायालयात धाव
नाशिक

परीक्षांबाबत 'मासू'ची सर्वोच्च न्यायालयात धाव

हस्तक्षेप याचिका दाखल

Bharat Pagare

नाशिक | Nashik

पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करावी, म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर १० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. यामध्ये म्हणणे मांडण्यासाठी 'महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन'ने (मासू) हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

विविध राज्यातील विद्यार्थी व राजकिय पदाधिकाऱ्यांनी यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या मार्गदर्शक सूचनांविरूद्ध जनहित याचिका दाखल केल्या आहेत. दरम्यान कराेनाची परिस्थिती लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजित करण्यात येऊ नये याकरिता सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या हस्तक्षेप याचिकेद्वारे सध्याची कराेनाची वस्तुस्थिती, आकडेवारी व संशोधन सादर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून मासूने केलेले सर्वेक्षण सुद्धा सादर केले आहे. तसेच या विषयावरील सर्व माहिती व संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी केलेले पत्रव्यवहारही याचिकेद्वारे सादर केले आहेत. मासूने हस्तक्षेपाच्या अर्जात म्हटले आहे की, सद्य परिस्थितीत आणि पुढील अनिश्चितता यामुळे विद्यापीठ परीक्षा घ्यायची की नाही हा निर्णय संबंधित राज्यांकडेच ठेवला जावा. आता या प्रकरणी १० ऑगस्ट २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी हाेणार आहे. देशभरातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष या सुनावणीवर असणार आहे.

मासूने दि. १७ मार्च २०२० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून हस्तक्षेप याचिका केली होती व त्याआधारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याने उपाययोजना कराव्यात या सूचना लक्षात घेऊन राज्याने सर्व परीक्षा पुढे ढकलेल्या होत्या. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचे शैक्षणिक भवितव्य लांबणीवर जाऊ नये व त्यांना उचित न्याय मिळावा याकरिता स्वतः मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी हस्तक्षेप करावे यासाठी एक पत्र लिहिले हाेते, असे मासूचे मीडिया -को-ऑर्डिनेटर सिद्धार्थ तेजाळे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com