एसटी महामंडळात मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा

प्रवासी संख्येत घट
एसटी महामंडळात मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा


नाशिक | Nashik

कराेना रुग्णवाढ नियंत्रणासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्चून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र निधी नसल्याने राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळात मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सर्वत्र लसीकरण वेगाने सुरू आहे. वैद्यकीय यंत्रणा देखील सज्ज आहेत. अशा वेळी रेल्वे स्थानकातून लसीकरण केंद्र, रुग्णालयात पोहोचण्यासाठी एसटीच्या वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. सुरुवातीला एसटी महामंडळातर्फे मास्क आणि सॅनिटायझर पुरवण्यात येत असे.

मात्र करोना नियंत्रणात आल्यानंतर हे बंद झाले. सध्या प्रवासी वाहतूक सुरू आहे; मात्र प्रवासी कमी असल्याने कमाई मंदावली. करोना काळात प्रवासी कमी झाल्याने उत्पन्न निम्मे घटले. यामुळे अनेक ठिकाणी डिझेलसाठी तर मास्क-सॅनियझरसाठी निधीची चणचण जाणवत आहे.

पुन्हा करोनाने डोके वर काढल्यानंतरही पुरवठा होत नसल्याने चालक-वाहकांमध्ये नाराजी आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांना ५० लाख रु.चा विमा मिळालेला नाही. अशातच आमचे बरे-वाईट झाल्यास महामंडळ, राज्य सरकार जबाबदारी घेणार का असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

एसटीचे चालक-वाहक प्रवासी वाहतूक करताना रोज शेकडो नागरिकांच्या संपर्कात येतात. अशा वेळी गाडीत प्रवेश करण्यापूर्वी आणि घरी जाण्यापूर्वी हात निर्जंतुक करण्यासाठी किमान सॅनिटायझरचा पुरवठा करावा, अशी मागणी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

करोना प्रादूर्भावाच्या वाढत्या प्रसारामुळे एसटीच्या चालक, वाहकांच्या सुरक्षेची काळजी प्रशासनाकडून अजिबात घेतली जात नाही. अनेक जिल्ह्यांत हँड सॅनिटायझर व मास्क पुरवलेले नाहीत. चालक, वाहकांच्या जिवाची पर्वा नाही. ही गंभीर बाब आहे.

दुसरीकडे कराेनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचा परिणाम राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे. निर्बंधांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत तब्बल २० लाखांची घट नोंदवण्यात आली आहे.

तर १६ एप्रिल राेजी उत्पन्न तीन कोटींवर आले. विशेषतः गावखेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल रोजी राज्यातील एसटी प्रवाशांची संख्या ३२ लाख २२ हजार होती आणि उत्पन्न ७.७८ कोटी होते.

वीकेंड लॉकडाऊननंतर प्रवासी संख्येत घट होत गेली. १५ एप्रिलला कडक निर्बंध जारी करण्यात आल्यानंतर वाहतुकीला मोठा फटका बसला. प्रवासी संख्येत घट होऊन ती १२ लाख ४१ हजारांपर्यंत पोहोचली, तर शुक्रवार १६ एप्रिल २०२१ राेजी केवळ तीन कोटींचे उत्पन्न मिळाले. याआधी १ एप्रिलला ७.७८ काेटी एवढे उत्पन्न मिळाले हाेते.

करोनाचे वाढते रुग्ण पाहता राज्यात वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी १० एप्रिल आणि रविवारी ११ एप्रिल रोजी प्रवासी संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळाले. ९ एप्रिल रोजी प्रवासी संख्या २९ लाख होती. १० एप्रिलला १३ लाख तर ११ एप्रिल रोजी घट होऊन ६.७७ लाखांवर आली.

एसटीतील बाधितांचा आकडा सहा हजारांहून अधिक झाला आहे. तर, ११८ हून आधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. कोरोना काळात सेवा देताना राज्यातील एकूण ५२३८ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.

दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांना करोनाचे प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांची यामध्ये नोंद नसून हा आकडा सहा हजारांहून अधिक झाला आहे. तर दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com