
मनमाड । बब्बू शेख | Manmad
दसरा सण (Dussehra festival) मोठा नाही आनंदाचा तोटा असे म्हणत शहर परिसरासह ग्रामीण भागात (rural area) दसरा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
मात्र गत दोन वर्षापासून असलेल्या करोना (corona) संकटातून काहीसे सावरत असताना यंदा महागाई (inflation) आणि अतिवृष्टीच्या (heavy rain) रूपाने आलेल्या संकटाने सर्वसामान्य नागरिक नागरीकांसह शेतकरी (farmers) त्रस्त असल्याने त्याचा परिणाम दसर्यावर देखील दिसून आला.
दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात दागिने, वाहन यासह इतर चैनीच्या वस्तूंची खरेदी केली जाते. मात्र वाढती महागाई (inflation) आणि अतिवृष्टीमुळे सर्वच जण संकटात आहे त्यामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट असल्याचे व्यापारी, दुकानदार, सराफ यांनी सांगितले. सलग झालेल्या पावसाचा फटका इतर पिकासोबत झेंडूच्या फुल शेतीला (Marigold flower) देखील बसला. त्यामुळे आवक कमी तर मागणी जास्त अशी अवस्था निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा झेंडूच्या फुलांच्या किमतीत मोठी वाढ होऊन देखील शेतकर्याच्या पदरी निराशाच आली.
भारतीय संस्कृतीत दसर्याला आगळेवेगळे महत्व व स्थान असल्यामुळे आजच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने (Gold and silver jewellery), नवीन कार, मोटारसायकल यासह इतर वस्तू खरेदी केल्या जातात. तर अनेक जण नवीन घरात, बंगल्यात गृह प्रवेश करतात. काही या शुभमुहूर्तावर नवीन व्यवसायाचा शुभारंभ देखील करतात. मात्र दोन वर्षे करोना (corona), लॉकडाऊनमध्ये (Lockdown) गेली.
आता करोना आटोक्यात आला मात्र महागाई व सलग दुसर्या वर्षी या भागात अतिवृष्टी (heavy rain) झाली असल्यामुळे पिके उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे यावर्षी देखील दसरा साजरा करण्यावर मर्यादा आली असल्याने पाहिजे तेवढा व्यवसाय झाला नसल्याचे व्यापारी, दुकानदार आणि सराफ यांनी सांगितले. सध्या बाजार पेठेला मंदीचा सामना करावा लागत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
सण-उत्सवाच्या काळात विशेषत: दसरा-दिवाळीला झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे सणासुदीच्या काळात दोन पैसे हातात पडतील या आशेवर शहर परिसरातील अनेक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीचा फटका फुल शेतीला बसला त्यामुळे फुलांची आवक कमी झाली त्यामुळे यंदा प्रथमच झेंडूच्या फुलांनी भाव खाल्ला.
सकाळी बाजारात झेंडूच्या फुलाला प्रतीकिलो 90 ते 120 रुपये इतका भाव होता. मात्र उत्पादनात मोठी घट झाली असल्यामुळे फुलांना चांगला भाव मिळाला असला तरी उत्पादन खर्च देखील निघू न शकल्याचे झेंडू उत्पादकांनी सांगितले.