लक्ष्मीपूजन साहित्यांनी बाजारपेठा सज्ज

लक्ष्मीपूजन साहित्यांनी बाजारपेठा सज्ज

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

चैतन्य-मांगल्याचे प्रतीक ठरलेल्या दीपोत्सवास (dipotsav) शहर व परिसरात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. लक्ष्मीपुजनासाठी (Lakshmi Pujan) व्यापारी-उद्योजकांसह नागरिक सज्ज झाले आहेत.

लक्ष्मी मूर्तीसह पूजा साहित्य, झेंडूची फुले, ऊस, वह्या, चोपड्या आदी पूजाविधीच्या साहित्य खरेदीसाठी आज बाजारपेठांमध्ये गर्दी उसळल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले. किराणा, कापडसह इतर साहित्यांच्या वाढलेल्या किंमती तसेच अतीवृष्टीचा (heavy rain) खरेदीवर बसला असून अपेक्षित साहित्य विक्री सलग तिसर्‍या वर्षी देखील होऊ न शकल्याची खंत व्यावसायिकांनी बोलून दाखवली.

महागाईपाठोपाठ (inflation) अतीवृष्टीने (heavy rain) आर्थिक गणित कोलमडले असले तरी शुक्रवारी वसूबारस (vasubaras) सणाव्दारे दीपोत्सवास शहरासह परिसरात उत्साहात प्रारंभ करण्यात आला होता. रंगीबेरंगी फुलमाळा व आकर्षक विद्युत रोषणाईने (electric lighting) व्यापारी प्रतिष्ठाने उजळून निघाली होती.

तर रंगीत रांगोळ्यांनी सजत असून सायंकाळनंतर घरोघरी प्रज्वलीत होत असलेल्या मातींच्या पणत्यांसह चित्ताकर्षक आकाशकंदिल (lantern) व विद्युत रोषणाईमुळे नागरी वसाहती प्रकाशपर्वात न्हावून निघाल्या होत्या. करोना (corona) शहरात पुर्णत: नियंत्रणात आल्याचा मोठा दिलासा असला तरी यंदा जीवनावश्यक वस्तूंच्या भडकलेल्या किंमती तसेच अतीवृष्टीसह परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्याने शेतीपिकांची अतोनात हानी (crop damage) झाल्याने त्याचा परिणाम यंदाच्या दिवाळी सणावर (diwali festival) दिसून येत आहे.

परतीच्या पावसाने खरीप हंगामाची (kharif season) पुर्णत: वाताहत केली. कापणीवर आलेली तसेच शेतात कापून ठेवलेली पिके व कांदाचाळी पाण्यात गेल्याने शेतकर्‍यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे (panchanama) केले असले तरी नुकसान भरपाई (compensation for damages) पदरी पडलेली नाही. त्यामुळे सण साजरा करावयाचा कसा? या चिंतेत बळीराजा त्रस्त आहे. तर जीवनावश्यक वाढलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरीक बेजार झाले आहे. याचा फटका बाजारपेठेस बसला असून किराणासह कपडे व इतर साहित्य खरेदी यावेळी अत्यल्प स्वरूपात केली जात असल्याने व्यापारी हैराण झाले आहेत.

शुक्रवारी आठवडे बाजार असल्याने बाजारात गर्दी होण्यास प्रारंभ झाला होता. चार दिवसापुर्वी शुकशुकाट असलेल्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढल्याने व्यापार्‍यांना विशेषत: किरकोळ मोठा दिलासा मिळाला आहे. संपन्नतेचे प्रतिक असलेल्या प्रकाशपर्वात लक्ष्मीपुजनासाठी व्यावसायिक व नागरीक सज्ज झाले आहेत. आज लक्ष्मी पुजनाच्या पुर्वसंध्येस बाजारपेठेत लक्ष्मी मुर्तीसह केरसुनी, लाह्या, बत्तासे, ऊस, झेंडूची फुले, श्रीफळ, रोजमेळ, वह्या व विविध प्रकारची फळे घेण्यासाठी महिला, नागरीकांनी बाहेर पडले होते.

त्यामुळे गुळबाजार, सरदार चौक, मोसमपुल, सटाणानाका, कॅम्प आदी बाजारपेठेत गर्दी दिसून आली. यंदा ग्रामीण भागातून आलेल्या विक्रेत्यांकडून केरसुनीसह झेंडू फुले, ऊस घेण्यास नागरीकांनी विशेषत: महिलांनी प्राधान्य दिल्याने किरकोळ विक्रेत्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले होते. सरदार चौक, सटाणानाका आदी भागात तर गर्दीने उच्चांक गाठल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार सातत्याने घडत असल्याने नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

तयार फराळास पसंती

विस्कटून टाकलेले आर्थिक गणित तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे यंदा देखील महिलांनी आर्थिक विवंचना लक्षात घेत तयार फराळाला पसंती दिली आहे. स्वयंपाक करणार्‍या हलवाई तसेच केटरींग व्यावसायिकांतर्फे सटाणारोड, सोयगाव मार्केट, कॅम्परोड, कॅम्प, रावळगावनाका, डी.के. परिसर आदी प्रमुख भागांसह नागरी वसाहती असलेल्या परिसरात शेव, चकल्या, पापडी, चिवडा, गाठीशेव, शंकरपाळे गोड फराळांच्या पदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात थाटण्यात आले आहे.

अर्धा व एक किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध असलेल्या या फराळाचे पदार्थाची खरेदी केली जात आहे. यंदा घरी बोलवून फराळ तयार करायचे काम खूपच कमी झाले आहे. त्यामुळे दिवाळीचे फराळ आम्हीच तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करून दिले असल्याचे स्टॉलधारक आचार्‍यांतर्फे सांगण्यात आले. मंदीचा फटका यंदा तयार फराळास देखील बसला असून महिला वर्गातर्फे हात आखडूनच खरेदी केली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com