बाजार समिती निवडणुका लांबल्याने इच्छुकांचा हिरमोड

तालुक्यात रंगणार सोसायटी, ग्रामपंचायत निवडणुकीचा फड
बाजार समिती निवडणुका लांबल्याने इच्छुकांचा हिरमोड

निफाड । आनंदा जाधव Niphad

मुदत संपलेल्या ग्रामपंचायती (grampanchayat) व सोसायटीच्या निवडणुकाआधी (election) बाजार समितीच्या (Market Committee) निवडणुका घेण्यास औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाने स्थगिती दिल्याने बाजार समिती संचालक होण्याचे अनेकांचे स्वप्न भंगले आहे.

तर मातब्बर नेत्यांनी देखील लासलगाव (laslgaon) व पिंपळगाव (pimpalgaon) बाजार समितीसाठी पॅनल (panal) निर्मितीला वेग दिला होता. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आता सोसायटीत नव्याने निवडून येणार्‍या कारभार्‍यांना बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारीची संधी मिळणार असल्याने ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे’ याप्रमाणे आता सोसायटीत प्रथम संचालक व्हावे लागणार आहे. साहजिकच सोसायटी व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने तालुक्यात पुन्हा राजकीय वातावरण तापणार आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारबेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीबरोबरच जिल्ह्यात सर्वात मोठी व सधन बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव बाजार समिती निवडणुकीचा बिगूल वाजला होता. मात्र करोनामुळे लांबलेल्या ग्रामपंचायत व सोसायटी निवडणुकांमुळे पुन्हा जुन्याच संचालकांना मतदानाचा हक्क प्राप्त होवून त्यांनाच उमेद्वारी करता येणार होती.

साहजिकच बाजार समिती निवडणुकीसाठी अनेकांनी व्यूहरचना चालविली होती. दोन्ही बाजार समितीसाठी जवळपास पॅनल निर्मिती अंतिम टप्प्यात आली असतांनाच मुदत संपलेल्या सोसायटी व ग्रामपंचायतीच्या निवडणुका अगोदर घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधिशांनी दिल्याने इच्छुक उमेद्वारांचा व नेत्यांचा हिरमोड झाला आहे. एकट्या लासलगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्राचा विचार करता येथे 54 पैकी 52 सोसायट्यांसाठी निवडणुका होत आहे.

साहजिकच सोसायटीच्या निवडणुकीनंतर सत्तेची समिकरणे बदलण्याची देखील शक्यता आहे. तालुक्यात 17 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी 28 सदस्य निवडून द्यावयाचे आहे. परिणामी या 28 सदस्यांना मतदानाचा हक्क (Right to vote) मिळणार आहे. साहजिकच विकास सोसायटीची सत्ता आपल्या ताब्यात रहावी यासाठी गावपाटीलकीच्या नेत्यांनी कंबर कसली असून सोसायटीच्या या निवडणुकीने दिवाळीनंतर मतदारांची खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे.

तर शह-काटशहामुळे सोसायटीचा फड चांगलाच रंगणार असून बाजार समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोसायटीच्या निवडणुका होत असल्याने सत्ताधारी व विरोधक यांचेत काटे की टक्कर पहावयास मिळेल. साहजिकच सोसायटीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी येथे प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर ज्यांना बाजार समितीसाठी उमेदवारी करावयाची आहे त्यांना स्वत:सह गावातील सोसायटीत पॅनल निवडून आणणे महत्वाचे ठरणार आहे.

तालुक्यातील दोन्ही बाजार समित्या सधन असल्याने व बाजार समितीत राष्ट्रवादी नेत्यांचाच सर्वाधिक भरणा असल्याने हे मातब्बर नेते आपल्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात सर्वाधिक सोसायट्या येण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. परिणामी त्यातून आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोसायटी, ग्रामपंचायतीनंतर बाजार समितीच्या निवडणुका होत असल्याने विद्यमान पदाधिकार्‍यांना किमान चार ते सहा महिन्यांंचा अधिक वाढीव कालावधी मिळण्याची शक्यता असल्याने हे पदाधिकारी खुशीत आहेत.

तर पुन्हा आपल्याच गटाची सत्ता बाजार समितीत यावी यासाठी ते प्रयत्न करण्याची शक्यता अधिक आहे. एकूणच पुढील 2022 हे वर्ष निवडणुकीचेच वर्ष राहण्याची शक्यता असून सोसायटी, ग्रामपंचायत, नगरपंचायत, बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक अशा निवडणुका होत असल्याने तालुक्यात वर्षभर निवडणुकांचा ज्वर पहावयास मिळणार असून नेते, कार्यकर्ते यांच्यासाठी हे वर्ष धावपळीचे ठरणारे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com