
नैताळे | वार्ताहर | Naitale
जालना (Jalna) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे म्हणून गेल्या सतरा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या समर्थनार्थ नैताळे येथील वाल्मीक बोरगुडे यांनी सुरू केलेल्या सरणावरील आमरण उपोषणाची पाचव्या दिवशी प्रणव पवार व राजेंद्र डोखळे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन सांगता करण्यात आली...
गेल्या सतरा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या अंतरवाली सराटी या गावी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या समर्थनार्थ नैताळे येथील वाल्मीक बोरगुडे यांनी सरणावर बसून 10 सप्टेंबर रोजी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर परिसरातील मराठा समाजाच्या तरुणांनी घरोघरी जाऊन एक गौरी-एक लाकूड गोळा करून नैताळे ग्रामपंचायतीसमोर सरण रचले होते.
वाल्मीक बोरगुडे यांनी प्रत्यक्षरीत्या उपोषण सुरू केल्यानंतर आज पाचव्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, महिला विद्यार्थी अशा सुमारे पंधरा ते वीस हजार समर्थकांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेटी देऊन समर्थन दिले होते. तसेच, जिल्ह्यातील असंख्य ग्रामपंचायत सामाजिक संस्थांनी पाठिंबाचे पत्र दिले होते.
तर नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षदा सानप, डॉ. शुभम निकुंभ, डॉ.रोहित धोक्रट, डॉ. नितीन धारराव, डॉ. हेमंत मंडलिक, डॉ. दिलीप कुमावत, डॉ. जाधव, डॉ. योगेश परदेशी यांनी त्यांच्या आरोग्य पथकासह वेळोवेळी उपोषणस्थळी भेटी देऊन उपोषणकर्त्याची आरोग्याची तपासणी करून त्याबाबतची काळजी घेतली.
तसेच, उपोषण कालखंडातील पाचही दिवस निफाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पटारे, हवालदार खरात, विलास बिडगर आदींनी कोणत्याही प्रकारची शांतता बिघडू न देता चोख बंदोबस्त ठेवला होता. शासनाचे प्रतिनिधी म्हणून तलाठी शंकर खडांगळे पाचही दिवस उपोषणस्थळी थांबून शासनाला वेळोवेळी माहिती देत होते. तर पाचही दिवस गावातील भजनी मंडळ, धारणगाव खडक, गाजरवाडी येथील गोंधळींनी कार्यक्रम सादर करून उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला.
उपोषणाच्या सांगतेप्रसंगी संजय बोरगुडे, राजेंद्र बोरगुडे, दादा बोरगुडे, रतन बोरगुडे, नवनाथ बोरगुडे, महेश पठाडे, रामकृष्ण दराडे, सुभाष कराड, दत्तू भवर, अमोल भालेराव, सदाशिव कोटकर, नितीन मोगल, शिवा सुराशे, राहुल बोरगुडे, दिलीप घायाळ, विजय बोरगुडे, सुनील बोरगुडे, चिंतामण देवरे, अरविंद बोरगुडे, सोपान बोरगुडे, राजू पठाण, जगन पाठक, रवींद्र बोरगुडे, नवनाथ बोरगुडे, अरुण घायाळ, शंकर घायाळ, पुंजाराम फडे, नवनाथ जाधव, देविदास बोरगुडे, बापू बोरगुडे, योगेश बोरगुडे, राजेंद्र घायाळ, नित्यानंद बोरगुडे, शांताराम डावखर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हाभरातून पाठिंबा
मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू केलेले वाल्मिक बोरगुडे यांचे सरणावरील आमरण उपोषणास सर्व समाजाचा आम्हाला जिल्हाभरातून व जिल्ह्याच्या बाहेरुन उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. शासनाच्या पोलीस, महसूल व ग्रामविकास विभागाचे वेळोवेळी उपोषण कालावधीत सहकार्य लाभले.
- राजेंद्र बोरगुडे, प्रवक्ते, मराठा समाज आरक्षण समिती, नैताळे.
प्रकृतीची काळजी घ्यावी
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ नाशिक जिल्ह्यातील नैताळे गावातील नागरिकांनी प्रथम सहभाग घेऊन समाजाच्या दृष्टीने गौरवास्पद कामगिरी केली. उपोषणकर्ते वाल्मिक बोरगुडे यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
- प्रणव पवार, नाशिक