मराठा समाजबांधव एकवटले; रायगडावर जाण्यासाठी नाशकात होतायेत गुप्त बैठका

मराठा आरक्षण
मराठा आरक्षण

नाशिक | प्रतिनिधी

शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा याच देही याची डोळा अनुभवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो वाहनांमधून शिवभक्त ५ जूनला दुपारी रायगडाकडे कुच करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने केला असल्याचे समजते आहे...

जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या गुप्त बैठका घेतल्या जात असून रायगडावर जाण्यासाठी नियोजन आखले जात आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर समाजात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला दिशा देण्यासाठी छञपतींचे वंशज खा. संभाजी राजे भोसले सक्रीय झाले असून राज्य सरकारकारला केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा लक्षवेधी ठरला आहे.

येत्या दोन दिवसात मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक भुमिका घेतली नाही तर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या समारंभानंतर छञपती खा. संभाजीराजे भोसले रायगडावरून मराठा एल्गारची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शासन प्रशासनाकडून मराठा समाजाच्या बैठकांना प्रतिबंध लावला जात आहे.

नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या बैठकीलाही प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ठिकठिकाणी गुप्त बैठका घेऊन रायगड वारीचे नियोजन आखले जात आहे.

छञपती खा.संभाजी राजे भोसले यांच्या निर्देशानुसार मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर,राजू देसले, एड शिवाजी सहाणे, तुषार जगताप, गणेश कदम, शिवा तेलंग, संदीप शितोळे, पूजा धुमाळ ,माधवी पाटील यांच्यासारखे आजवर पहिल्या फळीत काम करणारे समन्वयक या वेळी प्रथमच भुमीगत पध्दतीने गुप्त बैठकांना मार्गदर्शन करीत असून रायगडावर जाण्यासाठीचे नियोजन करण्याची जबाबदारी दुसऱ्या फळीवर सोपविण्यात आली आहे.

वेळोवेळी मिळत असलेल्या सुचनांच्या आधारावर अत्यंत गुप्त पध्दतीने हे नियोजन सुरू असून ५ जूनला रायगडाकडे प्रस्थान करण्यापुर्वी शासनाची एसओपी पाळण्याची अट घालण्यात आली असून प्रत्येकाने कोव्हिड टेस्ट करून बाधीत नसल्याची खाञी करून घ्यावी, एका वाहनात चार व्यक्ती, सोबत मास्क, सनिटायझर दोन दिवस पुरेल इतका कच्चा पक्का शिधा पिण्याचे पाणी बाळगण्याच्या सक्त सुचनाही दिल्या जात आहेत.

एकूणच आपले हक्क मिळवतांना शासकीय अटी शर्तींचा कुठेही भंग होणार नाही, महामारीचा प्रसार होण्यास आपण निमित्त ठरणार नाही याविषयी सतर्कता बाळगण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.

एकूणच बैठकांना प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही मराठा समाजाने रायगडावर जाण्याचा निर्धार गुप्त बैठकांमधून तडीस नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याने यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com