धरण
धरण
नाशिक

अनेक तालुके पाण्यासाठी धरणांवरच अवलंबून!

अन्यथा पाणी टंचाई....

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । नितीन गांगुर्डे

नाशिक आणि नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे उर्ध्व गोदावरी धरण समूह, गंगापूर धरण समूह आणि वैतरणा धरण समूहात अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यात सरासरी 900 मि.मी. पााऊस झाला होता. यंदा पाऊस पुरेसा पडला नाही तर मात्र एकीकडे करोनाचे सावट आणि दुसरीकडे पाणीटंचाई अशा दोन्ही बाबींचा सामना प्रशासनासह जनतेलाही करावा लागेल.

जिल्ह्याच्या पूर्व भागातील चांदवड, येवला, नांदगाव हे तालुके दुष्काळग्रस्त आहेत. मांजरपाडा प्रकल्पामुळे येवल्यातील पाणीटंचाई काहीशी कमी होणार आहे. तथापि काही प्रमाणात येवला, नांदगाव, चांदवड या तालुक्यांना दिंडोरी तालुक्यातील धरणांवरच आणि मालेगावलाही कळवण तालुक्यातील अर्जुनसागर, चणकापूर या धरणांतील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या तालुक्यांमधील जनता दिंडोरी, सुरगाणा, कळवण तालुक्यात किती पाऊस पडतो याकडेच लक्ष ठेवून आहे.

अर्जुनसागर प्रकल्पात सध्या 36.99 द.ल.घ.मी., चणकापूरमध्ये 68 टक्के द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा 80 टक्क्यांच्या पुढे गेला तरच मालेगावला पूर्ण पाणी मिळणार आहे. दुसरीकडे नांदगाव, येवला, चांदवड, मनमाड या तुषार्त भागालाही ओझरखेड, पालखेड, करंजवण, पुणेगाव ही धरणे भरण्याची अपेक्षा आहे. मांजरपाडा प्रकल्पाकडून यंदाही येवलेकरांना जास्त अपेक्षा करता येणार नाही. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी हे तालुके जरी पावसाचे माहेरघर समजले जात असले तरी येथेही उन्हाळ्यात पाणीटंचाई पुजलेली असते.

या तालुक्याच्या पश्चिम भागात पाझर तलाव, बंधारे नव्याने तयार करावे लागणार आहेत. तरच आदिवासी भागातील जटील पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटेल. सिन्नर, निफाड तालुक्यातील शेतकर्‍यांना कडवा प्रकल्पाच्या आवर्तनावरच अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या कडवा प्रकल्पात 6.74 द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा नगण्यच म्हणावा लागेल. नांदूरमध्यमेश्वर, वाघाड, पालखेड, गंगापूर या धरणांतील पाण्यामुळे निफाड हिरवागार आहे.

नाशिकच्या गोदावरीला एक पूरपाणी गेल्याने तसे नाशिक तालुक्यात समाधानकारक वातावरण आहे. नाशिककरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जानेवारीअखेरीपर्यंत तरी सुटला आहे. गंगापूर धरणात 160 द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर, आळंदी, कश्यपी धरणांतील पाण्याचा लाभ शेतकर्‍यांना होऊ शकतो.

याआधी झालेल्या पाणी नियोजन बैठकीत पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे नियोजन झाले आहे. आजपर्यंतच्या पावसाची नोंद घेतली असता यंदाचा पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत कमीच आहे. जर येत्या दोन महिन्यांत पुरेसा पाऊस पडला नाही तर मात्र हे नियोजन बदलावे लागेल.

Deshdoot
www.deshdoot.com