सातपूर | Satpur

नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मध्ये मोठ्या प्रमाणात मूलभूत समस्या असून, या समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. या दर समस्या सोडविण्याची मागणी सविता गायकर, संगीता उबाळे, कल्पना बैरागी, प्रियंका गायकर आदींनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रभागातील मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडूपे वाढली असून, त्यावर कचरा, घाणीचे साम्राज्य झाले आहे. मोकाट कुत्रे व जनावरांची संख्या वाढली आहे. प्रभागातील उद्याने ग्रीन जिम, साहित्य नादुरुस्त झाले आहे. प्रभागातील रस्त्यांची दूरवस्था झालेली आहे.

कार्बन नाका येथे असलेल्या भाजीबाजाराला अधिकृत मंजुरी द्यावी व त्या ठिकाणी मोठे पथदीप लावण्यात यावे. स्वतंत्र जागेमध्ये मटण मार्केटचीसुद्धा उभारणी करावी. वेगवेगळ्या ठिकाणी हॉकर्स झोन तयार करावी. कामाला जाण्याच्या व येण्याचा दुरवस्था झाली आहे. कार्बन नाका येथे वेळेत अवजड वाहनांस प्रवेशबंदी करावी. कार्बन नाका येथील नवीन मनपा शाळा विद्यार्थ्यांसाठी ई-उदघाटन करून सुरू करावी, प्रभागामधील अनेक स्ट्रीट लाइट हे बंद आहेत. ते सुरू करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत..

या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा करण गायकर, सदाशिव माळी, दिनकर कांडेकर आदींनी दिला आहे.