
नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad
माजी नगरसेवक अस्लम मणियार यांच्यासह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला....
माजी नगरसेवक असलम मनियार हे पूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. मात्र त्यानंतर देवळाली गाव येथे नगरसेवक सूर्यकांत लवटे व मणियार यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याने त्या ठिकाणी शिवसेनेत गटबाजी निर्माण झाली होती.
या गटबाजीला कंटाळून त्यांनी गेल्यावर्षी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र सात महिन्यापूर्वी सत्तांतर झाल्याने राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे हे विराजमान झाले. दरम्यान त्यानंतर मूळ शिवसेनेतील अनेक आमदार खासदार पदाधिकारी व नगरसेवक शिंदे यांच्या गटात सामील झाले त्याचप्रमाणे गेल्याच महिन्यात नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्यासह नाशिक रोडमधील पाच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला.
परिणामी देवळाली गाव येथील प्रभाग क्रमांक 22 मधून शिंदे गटातर्फे लवटे यांचा लढण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान लवटे हे शिंदे गटात गेल्याने अस्लम मणियार यांनी पुन्हा शिवसेनेत परतण्याचा विचार केला.
शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी त्यांच्यासोबत दोन ते तीन बैठका घेऊन शिवसेनेत येण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले त्यामुळे आज अस्लम मनियार यांच्यासह देवळाली गाव येथील प्रशांत जाधव त्याचप्रमाणे भाजपचे पदाधिकारी योगेश भोर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला त्यामुळे नाशिकरोड भाजपला एक प्रकारे मोठे खिंडार पडले आहे.
याप्रवेशाच्या वेळी खासदार संजय राऊत, उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, वसंत गीते, योगेश घोलप, माजी नगरसेवक विलास शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.