नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

सर्वात श्रेष्ठ जर कुठले दान असेल तर ते केवळ रक्तदान असून एका रक्तदात्यामुळे अनेकांना जीवनदान मिळते असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्यावतीने आयोजित ‘महा रक्तदान’ शिबिर उद्दघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, सचिव डॉ. मनिषा रौंदळ, खजिनदार रविंद्र दुसाने, संचालक किशोर माने, सुरेश डोंगरे, मोहन देसाई, देविदंर भेला, संजय पवार, डॉ. आबा पाटील, माधुरी गडाख, योगेश शिंदे, राजेंद्र फड आदी उपस्थित होते.

यावेळी रक्तदान शिबिराची पाहणी करून उद्दघाटन केल्यानंतर भुजबळ म्हणाले की, नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे योगदान मोठे आहे.

नाशिक सायकलिस्टने सायकलिंगच्या माध्यमातून नाशिक शहराची ओळख जगभर पोहचविण्यात मोलाचे काम केले आहे. आज त्यांनी रक्तदानाचे आयोजन करून ‘महा रक्तदानाचा अर्थ खरा समजून सांगितला असल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात अनेक कार्यक्रम बंद होते.

अशा वेळी आरोग्याच्या प्रश्नांवर केवळ काम सुरु होते. त्यामुळे या काळात आजवर कधी न घडलेला प्रसंग राज्यावर आला. राज्यात पहिल्यांदाच एवढा मोठा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला.

त्यामुळे राज्यसरकारला प्रथमच रक्ततूटवड्याची घोषणा करावी लागली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे राबवून हा रक्ततूटवडा भरून काढण्याची आवश्यकता आवाहन त्यांनी केले.