अनेक विद्यमान नगरसेवक विस्थापित तर काही येणार आमनेसामने

अनेक विद्यमान नगरसेवक विस्थापित तर काही येणार आमनेसामने

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नवीन प्रभाग रचनेनुसार ( New Ward Structure ) मनपा निवडणुकीत ( NMC Election ) सातपूर विभागातील ( Satpur ) पूर्वीच्या 20 नगरसेवकांच्या संख्येत दोनने घट होत असल्याने दोन नगरसेवकांची संधी हुकणार आहे. त्यात फेरआरक्षणामुळे अनेक ठिकाणी विद्यमान नगरसेवकांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. तर काही ठिकाणी एकाच पक्षातील दोन नगरसेवकांना परस्परांविरोधात लढण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

मनपा निवडणूकीसाठी विविध राजकिय पक्षांच्या विद्यमानांसह इच्छुकांनी तयारी केली होती. मात्र फेरआरक्षणांमुळे त्यांच्यासह कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाला. या आरक्षणामुळे काही नगरसेवकांना इतर प्रभागात विस्थापित होण्याची वेळ आली आहे. सातपूर विभागात प्रभाग 11,12,13,14,15,34 अशा 6 प्रभागांचा समावेश होणार आहे. पूर्वी विभागात 5 प्रभागतून 20 नगरसेवक निवडून आले होते. मात्र प्रभाग रचनेनंतर यंदाच्या निवडणूकीत 6 प्रभागातून 18 नगरसेवक मिळणार आहेत. त्यामुळे 2 नगरसेवक आपोआपच कमी झालेले आहेत.

या प्रभाग रचनेच्यां आरक्षण सोडतींनंतर बहुतांश प्रभागांत विद्यामन नगरसेवकांना विस्थापित व्हावे लागेल अथवा समोरासमोर लढण्याची पाळी येणार आहे.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चमत्कारांची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येत आहे. मनपाच्या आरक्षण सोडतीनंतर सातपूर विभागाच्या 18 नगरसेवकांमध्ये सर्वसाधारण गटातून 4 पुरूष व 4 महिलांचा समावेश होणार आहे. त्यासोबतच अनुसूचीत जातीचे 2 पुरुष,3 महिला, अनुसूचित जमातीच्या 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्गातून 2 पुरुष व 1 महिला निवडली जाणार आहे असे बलाबलं राहणार आहे.

प्रभाग निहाय बोलायचे झाले तर प्रभाग 11 मध्ये सर्वसाधारण गटाची एकच जागा असल्याने विद्यमान नगरसेवक शिवसेनेचे विलास शिंदे व संतोष गायकवाड यांच्यापैकी पक्षातर्फे एकालाच निवडणूक लढवता येणार आहे. त्यामुळे एक तर एका उमेदवाराला विस्थापित व्हावे लागेल अथवा दोघांना समोरासमोर लढण्याची वेळ येऊ शकते. प्रभाग 12 मध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण पडल्याने विद्यमान नगरसेवक रवींद्र देवरे यांची पंचाईत झाली आहे तर विद्यमान नगरसेवक दिनकर पाटील व माजी नगरसेविका लता पाटील यांना संधी निर्माण झाली आहे.

याठिकाणी माजी महापौर दशरथ पाटील आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी करीत आहेत. प्रभाग 13 मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण गट असे दोन आरक्षण असल्यामुळे या खुल्या गटात विद्यमान नगरसेविका माधुरी बोलकर, इंदुबाई नागरे व हेमलता कांडेकर या निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या ठिकाणी माजी नगरसेविका सुरेखा नागरे, राजाभाऊ नागरे हे देखील निवडणूक लढवण्याची शक्यता बळावत आहे.

प्रभाग 14 मध्ये मागासवर्ग प्रवर्गाचा एक आणि सर्वसाधारण महिला या दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात लढत होण्याची शक्यता आहे. या प्रभागातून माजी नगरसेवक सलीम शेख, शशी जाधव, नंदू जाधव, रेखा जाधव, पल्लवी पाटील हे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. प्रभाग 15 मधून आरक्षणामुळे विस्थापित होत सलीम शेख यांना प्रभाग 14 मध्ये निवडणूक लढवावी लागणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.

प्रभाग 15 मध्ये माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, माजी नगरसेविका दीक्षा लोंढे, सीमा निगळ, सुजाता काळे, ज्योती शिंदे, सविता काळे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याठिकाणी माजी नगरसेवक सलिम शेख आरक्षणामुळे त्यांच्या जागी पत्नी फरीदा शेख यांना निवडणूकीत उतरवण्याची शक्यता आहे. प्रभाग 34 मधून शिवसेनेचे दोन नगरसेवक होते. मात्र सर्वसाधारण गटात एकच जागा असल्याने विद्यमान नगरसेवक भागवत आरोटे व मधुकर जाधव यांच्यातून एकाला पक्षाकडून संधी मिळेल. यासोबतच माजी नगरसेवक सचिन भोर, नंदिनी जाधव, अ‍ॅड.वसुधा कराड या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com