नाशिक । Nashik

ग्राम पंचायत निवडणुकीची अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली असून ४०४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. बहुतांश उमेदवारांचे अर्ज जातप्रमाणपत्र आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणामुळे अपात्र ठरले. त्यामुळे अनेकांना निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे लागले असून ग्राम पंचायत लढवण्याचे स्वप्न भंग पावले आहे.

ऐन थंडित ग्राम पंचायत निवडणुकिमुळे गावाकडे धुराडा उडाला आहे. अर्ज छाननीत ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी अपात्र असतानाही दाखल केलेले अर्ज बाद झाले. विशेष म्हणजे शौचालय वापराच्या मुद्द्यावर एकही अर्ज बाद झालेला नाही.

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जवळपास १६ हजार अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची तालुकानिहाय छाननी करण्यात आली, त्यातील अनेक उमेदवारांचे अर्ज हे अनेकविध कारणांनी अपात्र ठरले. त्यामध्ये मागील निवडणुकीचा खर्च सादर न केलेले आणि त्यामुळे पुढील निवडणूक लढण्यास मनाई करण्यात आलेल्या उमेदवारांना फटका बसला.

मागील निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अशा उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी अपात्र ठरविलेले आहे. अशाच काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या इच्छुकांचे मनसुबे छाननीत उधळले गेले.

अर्ज बाद होण्यामध्ये बहुतांश कारणे ही मागील निवडणुकीतील अपात्रतेची आहेत, तसेच जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रकरण सादर केल्याची पावती किंवा तसे पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या इच्छुकांना देखील निवडणुकीच्या पायरीवरून उतरावे लागले. शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या मुद्द्यावरून काही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.