मनमाड वार्तापत्र: सलग संकटांनी शेतकरी हवालदिल

मनमाड वार्तापत्र: सलग संकटांनी शेतकरी हवालदिल

मनमाड । दि. 29 बब्बू शेख | Manmad

ग्रामीण भागात कामधंदा नसल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असल्याची सर्वथरातून ओरड केली जात असली तरी सद्यस्थितीत मात्र शेतात भरपूर काम आहे परंतु शेतमजूर मिळत नाही असे काहीसे चित्र मनमाड (manmad) परिसरासह ग्रामीण भागात निर्माण झाले आहे.

मुबलक पाणी, चांगला भाव यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांदा (Summer onion) लागवड शेतकर्‍यांतर्फे केली जात असली तरी मजूरटंचाई व वीजबील वसुलीसाठी (Electricity bill recovery) थेट ट्रान्सफार्मरचाच (Transformer) वीजपुरवठा (Power supply) खंडीत करण्याचे धोरण वीज वितरणने स्विकारल्याने कांदा उत्पादक (Onion growers) अक्षरश: हवालदिल झाले असून संकटांची ही मालिका थांबणार तरी केव्हा? असा प्रश्न त्यांना पडला आहे.

अतीवृष्टी (heavy rain), रोगट हवामान (Sick weather) व अवकाळीच्या लागोपाठ आलेल्या या संकटांनी खरीप हंगामासह (kharif season) कांदा रोपांची अक्षरश: वाताहत केली. द्राक्ष (Grapes), डाळींबसह मका, बाजरी तसेच भाजीपाल्याचे झालेले अतोनात नुकसान शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका देणारे ठरले. कापणीवर आलेल्या पिकांची अवकाळीने होत असलेली हानी शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू तराळणारी ठरली होती.

या नैसर्गिक संकटातून सावरत शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची तयारी कर्ज-उसनवारी घेत सुरू केली होती. गहू, हरभर्‍यासह उन्हाळ कांद्यावर त्यांची पुर्ण मदार होती. कांद्यास चांगला भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड शेतकर्‍यांतर्फे केली जात आहे. शेतकर्‍यांना कांदा कधी हसवतो तर कधी रडवतो यंदा मात्र कांद्याने लागवडीच्या वेळीच शेतकर्‍यांना रडण्याची वेळ आणून ठेपली आहे.

लागवडीसाठी मजुर मिळत नसल्याने शेतकरी अक्षरश: हैराण झाले आहेत. दामदुप्पट मजुरी देण्याची तयारी दर्शवून देखील आवश्यक मजुर उपलब्ध होत नसल्याने लागवड करायची तरी कशी? असा प्रश्न अनेक उत्पादकांसमोर उभा ठाकला असून समस्यांचे चक्र थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी अक्षरश: बेजार झाले आहे.

मनमाड (manmad) - नांदगावसह (nandgaon) कसमादे परिसर गत काही वर्षापासून कांदा उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. बहुतांश शेतकर्‍यांचे अर्थचक्र कांद्यामुळेच फिरत असल्याने त्याच्या लागवडीस प्रथम प्राधान्य दिले जाते. कांद्यात देखील भाव देवून जाणारा उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात लागवड करण्याकडे शेतकर्‍यांचा कल राहिला आहे. सलग तीन वर्षांपासून मनमाड परिसरासह जिल्ह्यात चांगला व दमदार पाऊस होत आहे.

यंदा तर काही भागात अतिवृष्टी झाली असल्यामुळे नदी-नाले, विहिरी आणि शेततळ्यात पाण्याचा मुबलक साठा आहे. त्यामुळे खरिपाचा हंगाम हातातून गेला असला तरी शेतकर्‍यांच्या सर्व आशा आता रब्बीच्या हंगामावर आहे. त्यामुळे कांदे, गहू यासह इतर पिकांची लागवड करण्यासाठी शेतीची मशागत केल्यानंतर बी-बियाणे, खते यांची व्यवस्था करून ठेवली होती.

विशेष म्हणजे बाजारात उन्हाळ कांद्यास देखील समाधानकारक भाव मिळत असल्याने यंदा उन्हाळी कांद्याच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पावसाळी कांद्याची काढणी तसेच उन्हाळ कांद्याची लागवड केली जात आहे. संपुर्ण परिसरात लागवड केली जात असल्यामुळे मजुर टंचाई निर्माण झाली आहे. लागवडीचे क्षेत्र वाढविण्यात आले असले तरी आवश्यक मजुुर लागडीसाठी मिळत नसल्याने शेतकरी अक्षरश: हैराण झाले आहेत.

मजुरांच्या उद्भवलेल्या टंचाईने कांदा लागवडीसाठी मजुरांची पळवापळवीचे प्रकार घडू लागले असून कधी नव्हे ते हॅलोजन लावून रात्रीतून शेतात कांद्याची लागवड करण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. काही गावात तर मजुरांनी बाहेर गावी जावू नये यास्तव वेगवेगळी बंधने टाकण्याचे प्रकार देखील घडू लागले आहेत.

गावातील काम सोडून दुसर्‍या ठिकाणी गेल्यास सामाजिक बहिष्कार (Social exclusion) टाकण्यापर्यंत फतवा काढण्याची मजल ग्रामपंचायतीने गाठल्याचे दिसून आले आहे. गावातीलच शेतात कामे करावीत यासाठी वेगवेगळी दडपणे टाकली जात असल्याने मजुरांमध्ये देखील रोष निर्माण होत आहे. मिळेल तिथे काम करण्याच्या आमच्या हक्कावर गदा आणली जात असल्याच्या तक्रारी देखील शेतमजुर करू लागले आहेत.

वाढीव मजुरी देऊन देखील मजूर मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यातूनच मजुरांच्या पळवापळवीचे प्रकार घडत आहेत. या परिस्थितीमुळे मजुरीचा दर देखील वाढल्याचा फटका शेतकर्‍यांना बसू लागला आहे. अतीवृष्टी, अवकाळीने रोपांचे नुकसान झाल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. आता दामदुप्पट मजुरीचा बसत आहे.

कांद्याचे बियाणे दिड ते दोन महिन्यात लागवडीसाठी तयार होते. या बियाण्याला गाठ तयार होण्यापुर्वीच त्याची लागवड शेतात करण्याची गरज आहे. अन्यथा ते खराब होते. त्यामुळे तयार रोपांची वेळेवर लागवड व्हावी यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र आवश्यक मजुर मिळत नसल्याने उपलब्ध मजुर व कुटूंबियांसह दिवसा तसेच रात्री सुध्दा थंडीचा कडाका सहन करत कांद्याची लागवड करण्याची वेळ आली असल्याची व्यथा मनमाड परिसरातील शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

अनेक गावात मजुरांची निर्माण झालेली टंचाई मात्र आज देखील कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. मजुर टंचाईचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांसमोर खंडीत वीजपुरवठ्याचे संकट उभे ठाकले आहे. वीज वितरणतर्फे सक्तीची वसुली हाती घेण्यात येवून थकबाकी असलेल्या भागातील ट्रान्सफार्मरचाच वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने लागवड केलेल्या कांद्यास पाणी द्यायचे तरी कसे? असा प्रश्न उत्पादकांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे कधी अस्मानी, कधी सुलतानी याचा सामना करीत असलेल्या बळीराजाला कोण कोणत्या संकटाचा सामना करावा? असा प्रश्न पडला आहे.

Related Stories

No stories found.