
मनमाड । प्रतिनिधी Manmad
शहराला पाणी पुरवठा करणार्या वागदर्डी धरणाने तळ गाठला असून सध्या धरणात पाण्याचा मृत साठा उरला आहे धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने शहरात भीषण टंचाई निर्माण झाली असून, हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ महिलांसह नागरिकांवर आली आहे.
दरम्यान, शहरात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालखेड धरणातून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आ. सुहास कांदे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.शहराचा पाणीपुरवठा हा पावसाळ्याच्या पाण्यावर कमी तर पालखेड धरणातून मिळणार्या रोटेशवर जास्त अवलंबुन आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यानंतर ते पाणी पाटोदा साठवणूक करण्यात येते त्यानंतर ते पाणी पंपिंग करून वागदर्डी धरणात घेतल्यानंतर शहरात पाणी पुरवठा केला जातो. पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटलेला असताना देखील मनमाड शहर परिसरात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. विशेषता वागदर्डी धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडेच असल्याने धरणातील पाण्याने तळ गाठला आहे.
एकीकडे पावसाने पाठ फिरवली तर दुसरीकडे धरणात जेमतेम पाणी उरले आहे. सध्या धरणात केवळ 25 दशलक्ष घनफूट इतकाच पाणी साठा शिल्लक असून त्यात सुमारे 3 ते 4 दशलक्ष घनफूट पाण्याचा मृत साठा आहे. त्यामुळे पालिका प्रशासनातर्फे शहरात महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जात असल्याने सव्वालाख नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
शहरावर आलेले पाणी संकट दूर करण्यासाठी पालखेड धरणातून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आ. सुहास कांदे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. पावसाअभावी धरणातील पाणीसाठा संपत आलेला आहेच शिवाय भूमिगत पाण्याची पातळी देखील झपाट्याने कमी होत असल्याने बोरवेल बंद पडू लागले आहे. त्यामुळे शहरावर पाणी टंचाईचे दुहेरी संकट उभे ठाकले असून पालखेड धरणातून पाण्याच्या आवर्तनाची नितांत गरज आहे. त्यामुळे लवकरात लवकर आवर्तनाचे पाणी देण्यात यावे अशी मागणी आ. सुहास कांदे यांनी पाटबंधारे विभागास दिलेल्या पत्रात केली आहे.
दरम्यान, शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागावा यासाठी आ. सुहास कांदे यांनी शासनाकडून तब्बल 350 कोटीची करंजवन पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणल्यानंतर तीचे युद्ध पातळीवर काम सुरु असून सुमारे 50 किमी पर्यंत पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम देखील जोरात सुरु आहे. जो पर्यंत ही योजना पूर्ण होत नाही तो पर्यंत नागरिकांना या ना त्या कारणाने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. योजना पूर्ण होताच शहरातील सव्वालाख नागरिकांना रोज पाणी मिळणार असले तरी आजमितीस आवर्तनाअभावी नागरीकांना भिषण पाणीटंचाईस सामोरे जाण्याची वेळ आली आहे.