नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

मानीव अभिहस्तांतरणासाठी राज्य सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थांच्या पुढाकारातून शुक्रवार (दि. १) पासून विशेष मोहीम राबविण्यास सुरूवात झाली आहे. १५ जानेवारीपर्यंत ही मोहीम सुरू असणार आहे.

या मोहिमेतंर्गत जनजागृतीसाठी उद्या (दि. २) तिडके कॉलनीतील ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात हौसिंग दरबार होणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था व प्लॉटधारकांना आता जमिनीची मालकी मिळणार आहे.

मोहिमेत जिल्हयातील जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्था तसेच अपार्टमेंटमधील सदनिकाधारकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांनी केले आहे.

स्थावर मिळकतीचे हस्तांतरण गृहनिर्माण संस्थेच्या नावावर करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. तसेच प्रस्तावाची मूळप्रत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर करावी लागणार आहे. नाशिक जिल्हयात ५ हजार ३४ संस्था असून, २ हजार ८९६ संस्थांची नोंदणी पूर्ण झाली असून, १९५ संस्थांचे मानवी अभिहस्तांतरण प्रमाणपत्र वाटप झाले आहे.

तर २ हजार ३०५ संस्थांची मानवी अभिहस्तांतरणाची प्रक्रिया अद्यापही शिल्लक आहे. त्यासाठी जिल्हा उपनिंबधक कार्यालयामार्फत विशेष मोहीम राबविली जात आहे.शुक्रवारी (दि.१) या मोहिमेचा जिल्हा उपनिंबधक सतीश खरे यांच्या उपास्थितीत शुभारंभ झाला. मानीव अभिहस्तांतरण मोहिमेबाबत जनजागृतीसाठी शनिवारी हौसिंग दरबार आयोजीत केला आहे.

त्यामध्ये नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाणार आहे. विशेष मोहिमेमुळे गृहनिर्माण संस्था/अपार्टमेंटमधील सभासद व सदनिकाधाकरांना मानीव अभिहस्तांतरणाचे फायदे होणार आहेत. या मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्था तसेच अपार्टमेंटमधील सदनिकाधारकांनी सहभागी होण्याचे आवाहन खरे यांनी केले.

अभिहस्तांतरणासाठी आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज व अजार्मागे दोन हजारांचा कोर्ट फी स्टॅम्प.सहकारी गृहनिर्माण संस्था अथवा कंपनी नोंदणी प्रमाणपत्र.विकासकाने मंजूर करून घेतलेल्या रेखांकन सर्व्हेसह तीन महिन्यांच्या आतील सातबारा उतारा. प्रत्येक सभासदाच्या सदनिकेच्या विक्री करारनाम्याची प्रत संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिकाधारकांची यादी बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र बिनशेती करण्यासाठी घेतलल्या परवानगीच्या आदेशाची प्रत