कुपोषित बालकांची होणार तपासणी
नाशिक

कुपोषित बालकांची होणार तपासणी

तपासणीसाठी अंगणवाड्याही होणार सुरू

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी

पावसाळ्याच्या दिवसांत बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण वाढत असल्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने राज्यातील कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही वेळापुरत्या अंगणवाड्या सुरू करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

तपासणी काळात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेपूर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

मार्च महिन्यापासून राज्यातील अंगणवाड्या करोनाचे संक्रमण टाळण्यासाठी बंद असून अंगणवाडी सेविका व मदतनीसांमार्फत कुपोषित बालक, स्तनदा, गरोदर मातांना घरपोच पोषण आहार वाटप करण्यात आले आहे.

मात्र, आता पावसाळा सुरू झाल्याने हा काळ आदिवासी व दुर्गम भागातील बालकांसाठी धोकादायक मानला जातो याच काळात कुपोषणाचे प्रमाण वाढण्याचे त्याचबरोबर कुपोषित बालके जन्माला येण्याचे प्रमाण वाढत असते.

या साऱ्या गोष्टीचा विचार करून एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

अति तीव्र कुपोषित बालकांचा शोध घेणे व त्याचे वजन उंची घेऊन त्यांच्या वाढीवर लक्ष ठेवले जाणार आहे. बंद पडलेल्या अंगणवाड्या नियमित स्वरूपात उघडण्यात याव्यात.

मास्कचा वापर करणे बंधनकारक

अंगणवाडी केंद्रात एक दिवसात फक्त पाच मुलांना तसेच गरोदर व स्तनदा मातांना बोलावण्यात यावे व त्यांचे वजन उंची घेऊन त्यांची नोंद करण्यात यावी. नवजात बालकांचे वजन करण्यासाठी वजन काटे वापरासंदर्भात जोडीसाठी असलेला कपडा पालकांनी घरूनच आणावे. तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com