तीव्र तापमानाने मालेगावकर हैराण

तीव्र तापमानाने मालेगावकर हैराण

मालेगाव । प्रतिनिधी | Malegan

शहर-तालुक्यात सुर्याचा प्रकोप वाढून पारा चढतच असल्याने उष्णतेच्या लाटेचा (Heat waves) उच्चांक दररोज वाढत असल्याने असह्य तप्त सुर्यकिरणे व झळांमुळे निर्माण झालेल्या उकाड्याने मालेगावकर अक्षरश: होरपळून निघत आहेत.

यातच सातत्याने खंडीत होत असलेल्या वीजपुरवठ्याने (power supply) भर टाकली असल्याने नागरीक अक्षरश: संत्रस्त झाले आहेत. 43.2 अंशावर पोहचलेल्या तापमानामुळे (Temperature) शहरातील जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) पुन्हा उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आल्याने मालेगावकर धास्तावले आहेत. तीव्र तापमान व उन्हाळी झळांचा त्रास जाणवत असल्याने उष्माघाताने बाधीत रूग्णांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे.

यामुळे नागरीकांनी दुपारी 12 वाजेनंतर घराबाहेर निघणे टाळले असल्याने बहुतांश प्रमुख रस्त्यांवर (main road) दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे. अंग भाजून काढणार्‍या तप्त सुर्यकिरणांमुळे (sun rays) ग्रामीण भागात (rural area) देखील जनजीवन विस्कळीत केले असून 1 वाजेनंतर शेतमजुर देखील झाडाच्या सावलीचा आधार घेत असल्याने शेतीची कामे देखील दिवसा जवळपास ठप्प झाली असून सायंकाळी उशीरापर्यंत शेतीची कामे शेतकर्‍यांसह मजुरांतर्फे केली जात आहे.

शहरासह तालुक्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी (Rainfall) तसेच बेमोसमी पाऊस उशीरापर्यंत झाल्याने यंदा उन्हाळा (summer) देखील असह्य करणारा राहणार असल्याचे संकेत ज्येष्ठ नागरीकांतर्फे दिले जात होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच तीव्र तापमान व अंग भाजून काढणार्‍या सुर्यकिरणांमुळे नागरीक हैराण झाले होते. एप्रिल महिन्यात तापमानाने अक्षरश: उच्चांक गाठला असून गत पंधरवड्यापासून तापमानाचा पारा 42 अंशावरच स्थिरावला आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळी 11 वाजेनंतरच सुर्यकिरणे अंग भाजून काढत आहे. त्यामुळे दुपारी 12 वाजेनंतर नागरीकांनी घराबाहेर निघणे टाळले आहे. रात्री उशीरापर्यंत उन्हाळी झळा जाणवत असून पंखे, कुलर देखील गरम हवा फेकत असल्याने नागरीक अक्षरश: कासावीस झाले आहेत.

या उन्हाळी झळांमुळे उष्माघाताचे आजार शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात बळावले असून आरोग्य केंद्रे (Health Centers) तसेच खाजगी रूग्णालये देखील उष्माघाताने बाधीत रूग्णांच्या गर्दीने फुलले आहे. ताप, जुलाब, उलटी व अशक्तपणा आदी त्रास उन्हाळी झळा लागल्यामुळे रूग्णांना होत असल्याचे दिसून आले आहे. तीव्र तापमानामुळे नागरीक हैराण झाले असतांना शहरासह तालुक्यात सातत्याने खंडीत होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे त्रासात भर घातली आहे. दिवसा व रात्री कधीही वीजपुरवठा खंडीत (Power outage) केला जात असून दोन ते तीन तास वीजपुरवठा बंद राहत असल्याने नागरीक उकाड्याने अक्षरश: त्रस्त झाले आहेत.

तीव्र तापमान तसेच रमजान पर्वामुळे रात्री उशीरापर्यंत यंत्रमाग व व्यापारी प्रतिष्ठाने सुरू ठेवली जातात. मात्र वीजपुरवठा सायंकाळी अनेक ठिकाणी खंडीत होत असल्याने त्याचा परिणाम उद्योग-व्यवसायांवर देखील झाला आहे. ग्रामीण भागात वीजेच्या लपंडावामुळे विहिरीत पाणी असून ते पिकांना देता येत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. तीव्र तापमानामुळे पिकांसह फळबागांवर परिणाम होत आहे. अशातच वीजपुरवठा खंडीत राहत असल्याने पाणी असून ते पिकांना देता येत नसल्याची खंत शेतकर्‍यांनी बोलून दाखवली.

उष्माघात बाधीत रूग्ण वाढले

शहर परिसरात तापमानाची तीव्रता वाढली असून तप्त सुर्यकिरणे व उन्हाळी झळांमुळे उष्माघाताचा त्रास जाणवत असलेले रूग्णांची संख्या वाढली आहे. तीव्र तापमानामुळे ताप, उलट्या, जुलाब, अशक्तपणाचा त्रास रूग्णांना होत आहे. सुदैवाने अद्याप सनस्ट्रोकने बाधीत रूग्ण आढळून आलेले नाहीत. उष्णतेची लाट ठान मांडून असल्याने नागरीकांनी महत्वाचे काम असेल तेव्हाच घराबाहेर पडावे. लांब पल्ल्याचा प्रवास दुचाकीवर करू नये. तसेच नारळ, लिंबू शरबत, ताक तसेच पाणी भरपूर प्यावे. डोक्यावर सुती कापड गुंडाळूनच घराबाहेर पडले पाहिजे. शक्यतोवर काळे व गडद रंगाचे कपडे न घालता पांढर्‍या फिकट रंगाचे कपडे घालावेत, अशी माहिती डॉ. सुधाकर पाटील यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना दिली.

Related Stories

No stories found.