मालेगावसह पालिका क्षेत्रात पोलिओ लसीकरण राबविण्यासाठी यंत्रणा सज्ज

मालेगावसह पालिका क्षेत्रात पोलिओ लसीकरण राबविण्यासाठी यंत्रणा सज्ज

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत मालेगाव तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 27 जून 2021 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेच्या शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी सुयोग्य नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी दिली आहे....

आज दुरदृश्यप्रणालीद्वारे उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली.

त्यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. अंतुर्लीकर बोलत होते. यावेळी प्राथमिक शिक्षण अधिकारी राजीव म्हसकर, नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अलका भावसार, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश नांदापूरकर आदी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर म्हणाले की, मालेगाव तालुका व मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील पाच वर्षाच्या आतील 42 हजार 692 बालकांना लसीकरण डोस देण्यात येणार आहे.

त्याकरीता 388 बुथ केंद्र स्थापन करून 676 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलिओ बूथ केंद्रावर न येणाऱ्या बालकांना थेट घरी जाऊन पोलिओचे डोस दिले जाणार आहेत. त्याकरिता स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. अंतुर्लीकर यांनी यावेळी सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सदर मोहिम राबविण्यासाठी योग्य खबरदारी घेणे आवश्यक असून, मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य यंत्रणा, पोलिओ बुथ कर्मचारी, अंगणवाडी व आशा कर्मचारी यांनी योग्य समन्वय ठेवणे गरजेचे आहे. या लसीकरण मोहिमेत समावेश असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कोविड-19 च्या अनुषंगाने विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलिओ लसीकरण बुथवर एकाच वेळी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन लसीकरण बुथ मोकळ्या जागेवर लावण्यात येणार असून, सामाजिक अंतराचे पालन करण्यात येणार आहे. तसेच बुथवर मास्क, हॅण्डवॉश, सॅनिटाझर यांची पुरेशी व्यवस्था ठेवून नियोजन करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्री. अंतुर्लीकर यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com