
मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
शहरात करोना बाधितांची संख्या वाढत असताना जनतेत संक्रमणाची दिसून येत नसलेली भीती चिंताजनक आहे. मास्कचा वापर तसेच सुरक्षित अंतर राखणे आदी आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे पालन न झाल्यास शहरात पुन्हा लॉकडाऊन सुरू करावे लागेल, असे स्पष्ट करत मनपा आयुक्त दीपक कासार यांनी खासगी डॉक्टरांनी शासन नियमाप्रमाणे करोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल करावेत, अन्यथा त्यांच्या रुग्णालयाची नोंदणी रद्द करत गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला.
गेल्या काही दिवसांपासून शहरात बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त दीपक कासार यांनी शहरातील करोना उपचार केंद्रांना भेटी देत उपचार व्यवस्थेची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, शहर अभियंता कैलास बच्छाव, डॉ. हितेश महाले, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी आदी अधिकारी उपस्थित होते.
आज पत्रकार परिषद घेत आयुक्त कासार यांनी नागरिकांतर्फे आरोग्य यंत्रणेच्या सूचनांंचे पालन होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. रुग्णसंख्या वाढत असल्याने नियमाचे पालन गांभीर्याने होणे गरजेचे आहे. मास्क न वापरणार्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आयुक्त कासार यांनी स्पष्ट केले. खासगी डॉक्टरांनी बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करत उपचार करावेत. तसेच खासगी लॅब चालकांनी रुग्णांची माहिती त्वरित मनपास द्यावी अन्यथा त्यांची नोंदणी रद्द करण्यात येऊन गुन्हा दाखल केला जाईल.
महात्मा फुले आरोग्य योजनेंत समाविष्ट रुग्णालयांनी बाधित रुग्णांना दाखल करत उपचार करावेत. या रुग्णांच्या उपचाराचे बिल शासनातर्फे दिले जाते. रुग्णांना दाखल न केल्यास अशा रुग्णालयांचा देखील परवाना मनपा रद्द करेल. खासगी रुग्णालयात उपचार केले जाते किंवा नाही, हे पाहण्यासाठी मनपातर्फे भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे.
उपचारासाठी यंत्रणा सज्ज
मनपातर्फे विविध करोना उपचार केंद्रात २५०० बेड उपलब्ध आहेत. यात ऑक्सिजनची सुविधा असलेले ५५० बेड आहेत. औषधांचा साठादेखील मुबलक असून एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आयुक्त कासार यांनी दिली.